चिंचवड : येथील अजिंठानगर परिसरातील पंचशिल बुद्धविहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित करण्यात बाल संस्कार शिबिराला सुरुवात झाली. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डी. व्ही. सुरवसे हे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला जिल्हा महासचिव भगवान शिंदे, कोषाध्यक्षा सुजाता ओव्हाळ, समता सैनिक दलाचे मेजर जनरल पी. एस. ढोबळे, अनिल सोनवणे, अरूण सोनवणे, सरचिटणीस भीमराव ढोबळे, रामचंद्र आचलकर, संस्कार शिबिर उपाध्यक्ष अशोक सरतापे आदी उपस्थित होते.
मुलांना धर्माच्या गोष्टी कळण्यासाठी या शिबिराचा उपयोग होणार आहे. दुपारी तीन ते पाच या कालावधीत पार पडणार्या या शिबिरामध्ये धम्म प्रतिज्ञा, गौतम बुद्धांचे बालपण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण, बौद्ध धर्मिय मुले कशी असावीत, बौद्धांचे सण, त्रिशरण पंचशील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना संदेश, भारतीय बौद्धांची मातृसंस्था-भारतीय बौद्ध महासभा आदी बाबी शिकविण्यात येणार आहेत. भारतीय बौ÷द्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य हे मार्गदर्शन करणार आहेत.