माद्रिद । पहिल्या सामन्यात एकतर्फी पराभव पत्करणार्या भारतीय महिला हॉकी संघाने दुसर्या कसोटी सामन्यात बलाढ्य स्पेनला 1-1, असे बरोबरीत रोखताना चमकदार कामगिरी बजावली. मात्र, पहिला सामना 3-0 असा जिंकणार्या स्पेनच्या महिला हॉकी संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यांनंतर 1-0 अशी आघाडी कायम राखली.स्पेनच्या महिला संघाने दुसर्या सामन्यातील पहिल्या दोन सत्रांमध्ये आपले वर्चस्व कायम राखताना सलग दुसर्या विजयासाठी पायाभरणी केली होती.
मात्र, नंतरच्या दोन्ही सत्रांमध्ये जोरदार झुंज देणार्या भारतीय महिला संघाने ही लढत बरोबरीत सोडवताना चुकांमधून शिकत असल्याचे दाखवून दिले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्पेनच्या बेर्टा बोनास्ट्रेने सामन्याच्या 14व्या मिनिटाला पहिला गोल करताना आपल्या संघाला 1-0 असे आघाडीवर नेले. पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला संघाने दुसर्या सत्रात प्रतिआक्रमण करताना गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, स्पेनची गोलरक्षक मारिया रुईझला चकविणे त्यांना जमले नाही. त्यामुळे स्पेनने मध्यंतराला 1-0 अशी आघाडी कायम राखली. तिसर्या सत्रात भारताच्या बचावपटूंनाही सूर गवसला. त्यामुळे स्पेनच्या आक्रमकांना गोलपासून दूर ठेवण्यात भारतीय महिलांना यश आले. चौथ्या सत्रात भारतीय आक्रमणाचा वेग वाढल्याचे दिसून आले आणि 54व्या मिनिटाला त्याचे फळही मिळाले.