हैदराबाद। भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी बडोद्याचे माजी फलंदाज तुषार आरोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याच्या प्रशिक्षक पूर्णिमा राव यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. महिलांची विश्वचषक स्पर्धा जून व जुलैमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी आरोटे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आरोठे 2008 ते 2012 या कालावधीत महिला संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक होते.
निवडीनंतर आरोठे म्हणाले, संघातील वरिष्ठ खेळाडूंबरोबर मी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर पुन्हा काम करताना मला अडचण येणार नाही. भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात चार देशांच्या आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी होणार आहे. भारत व आफ्रिका यांच्याबरोबरच आर्यलड व झिम्बाब्वे यांचाही या मालिकेत समावेश आहे. या मालिकेनंतर विश्वचषक स्पर्धा होणार असून भारताला पहिल्या सामन्यात डर्बीशायर येथे इंग्लंडशी खेळावे लागणार आहे.
विश्वासात घेतले नाही: राव
संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड करताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे पूर्णिमा राव यांनी सांगितले. यशस्वी प्रशिक्षक म्हणून माझी कारकीर्द चांगली झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आठ मालिकांमध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली भारताने विजय मिळवला होता. कोणतेही कारण न देता किंवा माहिती न देता माझ्याकडून प्रशिक्षकपद काढून घेण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेला केवळ एक महिना राहिला असताना हा आकस्मिक बदल झाला आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू दुखावणार नाहीत, अशी मी अपेक्षा करते, असेही त्या म्हणाल्या.