डर्बी- महिला क्रिकेटच्या विश्वचषकातील अत्यंत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाने पाकचा दारूण पराभव केला. या माध्यमातून काही दिवसांपुर्वी चँपिअन्स ट्रॉफीत पाकने भारतीय संघाच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघाने पाकला माफक 170 धावांचे दिलेले आव्हानदेखील पाकला पेलवता आली नाही. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 74 धावांमध्ये बाद झाल्याने भारताने तब्बल 95 धावांनी विजय मिळवला.
चुरशीच्या लढतीची होती अपेक्षा
भारत आणि पाकमधील कोणताही सामना हा चुरशीचा होत असतो. या पार्श्वभूमिवर रविवारी भारत व पाकच्या महिला संघांमधील सामना चुरशीचा होणार असल्याचे मानले जात होते. भारतीय संघ अतिशय फॉर्मात असून, गेल्या चारही एकदिवसीय मालिका त्यांनी जिंकल्या आहेत. या संघाने श्रीलंका व विंडीजविरुद्धची मालिका जिंकली. मग विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत आणि चौरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला हरवतले. विश्चषकाचा विचार करता भारताने यजमान इंग्लंडसह विंडीजविरुद्ध दणदणीत विजय संपादन केला होता. तर दुसरीकडे साना मिरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने विश्वचषक स्पर्धेत अद्याप विजय मिळवलेला नव्हता. दक्षिण आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताविरुद्ध आपले विश्वचषकातील खाते उघडण्याची त्यांना मोठी संधी होती. मात्र यात त्यांना अपयश आले.
माफक आव्हानही नाही पेलवले
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करतांना 50 षटकात नऊ गडी बाद 169 धावा केल्या होत्या. भारताच्या मातब्बर फलंजादांनी आजच्या सामन्यात निराशा केली. मात्र पुनम राऊत (47) तर सुषमा वर्मा (33) यांच्या खेळीमुळे भारताने दीडशे धावांच्या पलीकडे मजल मारली. तर पाककडून अस्मावी इकबाल हिने भेदक मारा करत तीन गडी बाद केले. तर नासरा संधू व सादिया युसुफ यांनी प्रत्येक एक गडी बाद केला. तर या आव्हानाचा पाठलाग करतांना पाकचा डाव गडगडला. साना हिच्या 29 धावांचा अपवाद वगळता अन्य कोणतीही खेळाडू धावपट्टीवर टिकाव धरू शकली नाही. यामुळे पाकचा डाव अवघ्या 74 धावांमध्ये संपुष्टात आला. अर्थात भारताने तब्बल 95 धावांनी विजय संपादन केला.