भारतीय मुस्लिमांवर अत्याचार होऊ देणार नाही: नितीन गडकरी

0

नागपूर: देशात नागरिकत्व कायदा लागू केल्यानंतर अनेक ठिकाणी हिंसा उसळून, विरोध प्रदर्शन सुरु आहे. देशातील विरोधी पक्षांनी या विरोधात धरणे प्रदर्शन सुरु केले आहे. तर काही ठिकाणी या कायद्याला समर्थन करण्यासाठी मोर्चे निघाले आहे. नागपूर येथे या कायद्याच्या समर्थनार्थ लोकाधिकार मंच आणि इतर संघटनांच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी ‘हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे हे हिंदूंना जातीवादि म्हणणाऱ्यानी समजून घ्यायला हवं. नागरिकत्व कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. भारतीय मुस्लिमांवर कधीही अत्याचार होऊ देणार नसल्याचे सांगितले.

हिंदू धर्म सर्व धर्मांचा, सर्व ईश्वरांचा सन्मान कराण्यास शिकवतो. भारतातील मुस्लिमांना इतर देशात गेल्यावरही हिंदू म्हणूनच ओळखलं जातं. मग हिंदू असणं हे पाप आहे का?, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून मतांच्या राजकारणासाठी कायद्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. बांगलादेश हा हिंदुस्तानापासून वेगळा नसल्याचंही विधान यावेळी गडकरींनी केले.

अत्याचारग्रस्तांना भारत आधार देईल, पण घुसखोरांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच सरकार काम करत आहे. तसेच पाकिस्तानातील हिंदूंची घटती संख्या यावरही गडकरींनी बोट ठेवलं. पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदू होते, ते आज केवळ ३ टक्के झाले आहेत. अनेकांचं धर्मांतरण झालं, अत्याचार झाले, असं गडकरी म्हणाले.