भारतीय युवा फुटबॉल संघ युरोप दौर्‍यावर

0

लिस्बन । 17 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय युवा संघ युरोप दौर्‍यावर आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचे युरोपमध्ये सराव सामने होणार आहेत. यातील पहिला सामना पोर्तुगालच्या व्हिटोरिया डी सेतुबल क्लबच्या युवा संघाशी होणार आहे.

भारतीय संघाला युरोपियन फुटबॉल संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिटोरियाविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय युवा संघ बेलेनेन्सेस, बेनफिका, इस्टोरिल व स्पोर्टिंग क्लब पोर्तुगाल या पोर्तुगीजमधील विविध क्लब संघांविरुद्ध सामने खेळणार आहे. भारतीय संघाचा हा दौरा 11 एप्रिलपासून सुरू झाला असून 15 मे पर्यंत ते लिस्बनमध्ये राहणार आहेत. त्यानंतर पॅरिस सेंट जर्मेनच्या 17 वर्षांखालील संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारतीय युवा संघ फ्रान्सला प्रयाण करेल.

लुईस नॉर्टन डी मातोस यांच्या मार्गदर्शनाखालील हा युवा संघ लॅझिओ कपमध्येही सहभागी होणार असून इटली, फ्रान्स, हंगेरी येथे सराव सामन्यांची मालिकाही ते खेळणार आहेत. ‘विश्वचषक स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम संघ खेळावा यासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने जे प्रयत्न चालविले आहेत ते कौतुकास्पद आहेत,’ असे डी मातोस म्हणाले. ‘जास्तीत जास्त खेळाडूंचे निरीक्षण मला करता यावेत यासाठी हे प्रयत्न सुरू असून विविध क्लब्स, लीग व एआरएफएफ भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी एकत्र आलेत हे पाहून मला खूप आनंद वाटतो,’ असेही ते म्हणाले.