गूड न्यूज! रेल्वेतही इकॉनॉमी एसी क्लास!

0

नवी दिल्ली : सर्वसामान्य प्रवाशांनाही लांबपल्ल्याच्या रेल्वेतून स्वस्तात आणि वातानुकुलित प्रवास करता यावा म्हणून रेल्वेने फुल एसी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, विशेष म्हणजे या एसी ट्रेनमध्ये ’इकॉनॉमी एसी क्लास’ ही नवी कॅटेगिरी सुरू करण्यात येणार आहे. या नव्या डब्यातून प्रवाशांना स्वस्तात आणि गारेगार प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत केवळ गरीब रथ रेल्वेतूनच कमी दरात एसीचा प्रवास करता येत होता. मात्र यापुढे सर्वच एक्स्प्रेस आणि सुपर फास्ट गाड्यांमध्ये अशी सुविधा दिली जाणार आहे.

स्वस्तात करा गारेगार प्रवास!
सध्या थर्ड एसी कोचसाठी जी रक्कम मोजावी लागते त्यापेक्षाही कमी पैशात नव्या एसी कोचमधून प्रवाशांना प्रवास करता येईल. त्यासाठी रेल्वेने संपूर्ण एसी ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या लांबपल्याच्या गाड्यांमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी अशी कॅटेगिरी आहे. आता या नव्या फुल एसी ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसीबरोबर ’इकॉनॉमी एसी क्लास’ ही नवी कॅटेगिरी असेल. नव्या एसी रेल्वेत इकॉनॉमी एसी क्लासचे तीन डब्बे असतील आणि त्याचे तिकीट खूपच स्वस्त असेल. नव्या इकॉनॉमी एसी क्लासमध्ये प्रवाशांना चादर देण्यात येणार नाही. कारण या डब्ब्यातील तापमान 24 ते 25 डिग्री सेल्सियस एवढे असेल. या नव्या गाडीतील दरवाजे स्वयंचलित असतील. सध्या काही निवडक मार्गावर ही संपूर्ण वातानुकुलित रेल्वे धावेल. असे असले तरी याचा जास्तीत जास्त प्रवाशांना लाभ मिळावा म्हणून रेल्वेने प्रयत्न सुरू केला आहे.

लवकरच अन्य मार्गावरही सुविधा
’इकॉनॉमी एसी क्लास’ची सुविधा सुरुवातीला काही मार्गांवर सुरु केली जाणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. प्रवाशांना ही सेवा आवडल्यास अन्य मार्गावरदेखील त्याचा विस्तार करण्याची योजना आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ’गरीब रथ’ गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. या गाड्यांमधील तिकीटाचे दर अन्य एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांच्या एसी कोचपेक्षा कमी असतात. अर्थात ’गरीब रथ’मधील सीटची लांबी थोडी कमी असते आणि चादर, उशी यासाठी स्वतंत्र भाडे द्यावे लागते. रेल्वेतील जुन्या सुविधांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी रेल्वेने एक विशेष टीम स्थापनही केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने सुरू केलेल्या ’हमसफर’ ट्रेनच्या धर्तीवरच या सुविधा देण्यावर या टीमचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

असा असेल नवा ’इकॉनॉमी एसी क्लास’
* या डब्यातून प्रवास करताना स्वतंत्र चादरची गरज लागणार नाही.
* या डब्यांचे तापमान 24-25 डिग्री इतके ठेवले जाणार आहे.
* डब्यांचे दरवाजे ऑटोमेटिक असतील. अर्थात ही सुविधा अन्य एसी कोचसाठी सुरु केली जाईल.
* ’इकॉनॉमी एसी क्लास’ची तिकीटे अन्य क्लासप्रमाणे उपलब्ध असतील.