भारतीय रेल्वेला आले अच्छे दिन

0

भुसावळ। जपान व चीनमध्ये रेल्वेचा झालेला विकास हा अभ्यासण्याजोगा आहे. येथील कर्मचार्‍यांची प्रामाणिकता, सचोटी आणि नाविन्याचा ध्यास घेऊन काम करण्याची प्रवृत्ती यामुळेच तेथील रेल्वेचा विकास झालेला दिसून येतो, त्यामुळे आपल्यालाही त्यांच्याकडून हे गुण घेत लाचेच्या नव्हेतर बुध्दीमत्तेच्या जोरावर विकासाची वाट धरायची आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे सुध्दा अत्याधुनिक होण्यास वेळ लागणार नाही, त्यादृष्टीने आता वाटचाल सुरु झाली असून भारतीय रेल्वेला अच्छे दिन आले असल्याचे प्रतिपादन जम्मू काश्मिर रेल्वेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी तथा रेल्वे आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासक यशवंत जोगदेव यांनी केले. मध्य रेल्वेच्या विद्युत इंजिन कारखान्यातील अभियंत्यांना ‘आव्हान नवतंत्रज्ञानाचे’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशविदेशातील रेल्वे तंत्रज्ञानाचा केला अभ्यास
मध्य रेल्वेच्या विद्युत इंजिन कारखान्यातील सभागृहात रेल्वेच्या विविध शाखेतील अभियंत्यांना ‘आव्हान नवतंत्रज्ञानाचे’ या विषयाअंतर्गत ‘भारतीय रेल्वेतील आधुनिकता’ संबंधित मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी मुबंई येथून रेल्वेतील आधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यास यशवंत जोगदेव यांना आमंत्रित करण्यात आले होते. जोगदेव यांनी जम्मू- काश्मिर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केले आहे. तसेच विदेशातील रेल्वे तंत्रज्ञान आणि भारतीय रेल्वे तंत्रज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. तसेच ऑल इंडिया ओबीसी असोसिएशनचे ते सल्लागार देखील आहेत.

नव्याने रचला जातोय पाया
देशात सत्तांतरानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वेची सुत्रे हाती घेतली आहेत. मात्र ते पाच वर्षात काहीच करु शकत नाही. त्यांना अगोदर जुनेच खड्डेच भरावे लागत आहे. भारतीय रेल्वेचा पाया नव्याने रचला जात असून याचे फायदे मात्र कालांतराने आपणास दिसतील असेही जोगदेव म्हणाले. येत्या काळात रेल्वेत कुणीही लाच देऊन नोकरी करु शकत नाही तर आपल्या बुध्दीच्या जोरावर तसेच आव्हानात्मक तंत्रज्ञानाच्या अभ्यासामुळेच नोकरी करणे शक्य आहे. तसेच ज्या रेल्वेवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. त्या संस्थेचे नुकसान नव्हता फायदा कसा होईल हाच विचार समोर ठेऊन काम केले पाहिजे. यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. टीमवर्कने काम केल्यास नक्कीच चांगले बदल पहावयास मिळतील. सद्यस्थितीत विदेशी कंपन्या आपल्याला तंत्रज्ञान देण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आपल्याला देखील बदल स्विकारुन नवनविन तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

शंकांचे केले निरसन
याप्रसंगी मुख्य कारखाना प्रबंधक जी.सी. पवणीकर, सिनीअर ईडिएम बी.एल. बाथो, एडब्ल्यूएम आर.एम.श्रीवास्तव, एडब्ल्यूएम रामपाल यादव, एसी अ‍ॅण्ड एम चाहोजी, मुख्य निरीक्षक एस.जे.कासार, सुरक्षा अभियंता सी.डब्ल्यू. पाटील, ओबीसी असोशिएशन सचिव एम.व्ही. पाटील, ओबीसी अध्यक्ष एम.डी. पाटील यांसह विविध विभागाचे अभियंत्यांची उपस्थिती होती. यावेळी अभियंत्यांनी बदलत्या तंत्रज्ञाना संबंधित विचारलेल्या शंकांचे निसरन जोगदेव यांनी केले.