भारतीय रेल्वेसह प्रवासी सुरक्षेला प्राधान्य द्यावे

0

भुसावळ। भारतीय रेल्वेची आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षा हि आपल्या दृष्टीने महत्वाची असून प्रत्येक कर्मचार्‍याने आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. कर्तव्यात कसूर झाल्यास प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रवासी हिताला प्राधान्य देऊन सर्तक रहा असे आवाहन मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांनी केले. शुक्रवार 14 रोजी भुसावळ येथे भेट देऊन त्यांनी वार्षिक निरीक्षण केले. सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांनी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीन वर आरपीएफ कर्मचार्‍यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कामकाजाबद्दल जाणून घेतले. कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निरीक्षक व्ही. के. लांजिवार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचार्‍यांना केल्या सुरक्षाविषयक सूचना
यादरम्यान दुबे यांनी विविध विषयांसंदर्भात रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेत प्रवाशांची वर्दळ अधिक असते त्यामुळे याचा गैरफायदा घेऊन काही विघातक प्रवृत्ती आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र आपण अधिक सतर्कता बागळणे गरजेचे असल्याचेही दुबे यांनी सांगितले. प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावावी आणि जगवावी, तसेच ताण-तणाव टाळावा, स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. रेल्वे मैदानाशेजारील सुरक्षा बल असोसिएशन यानंतर दुबे यांनी स्थानक परिसर, फलाट, महिला व बाल सुधार केंद्र, सीसीटीव्ही रुम (फलाट चार) आदींची पाहणी केली आणि सुरक्षाविषयक सूचना केल्या.