भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास प्रारंभ

0

पिंपरी-चिंचवड । पिंपरी येथील एच.ए. मैदानावर शुक्रवारपासून भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास सुरूवात झाली. यामध्ये युद्धकाळात वापरण्यात येणारे क्रेन, रणगाडे, शस्त्र, त्यांची इतर अवजारे, रडार, तोफ आदी पाहण्याची संधी शहरवासियांना मिळाली आहे. महापालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ऑफ खडकी यांनी संयुक्तपणे याचे आयोजन केले आहे. शनिवारअखेर सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना खुले आहे.

सकाळी अकरा वाजता आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, लष्करी अधिकारी यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना भारतीय लष्कराचे इन्फंटरी, आर्म्ड, इंजिनिअर्स, सिग्नल्स, एअर डिफेन्स, मेकॅनाईज्ड आदीमध्ये वापरण्यात येणार्‍या यंत्रसामुग्री पाहता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना अधिक कुतुहल
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन खुले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी रणगाड्यावर चढून रणगाड्यांची माहिती जाणून घेतली, भारतीय लष्कराला एवढे जवळून पाहणे, वर्दीचा सहवास सगळ विद्यार्थ्यांसाठी नवीन होते व आर्मीच्या जवानांसाठीही. जवान अगदी खोलात छोट्या मुलांना रणगाड्यांची, तोफांची माहिती देत होते. विद्यार्थीही त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकाचे निरसन करत होते. यावेळी काही जवानांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही या प्रदर्शनात आवर्जून बोलावले होते. यामध्ये भारतीय लष्कराचे क्रेन, रणगाडे, शस्त्र, त्यांची इतर अवजारे, रडार, तोफ आदी पाहण्याची संधी मिळणार आहे.

जवांनानाही पडली भुरळ
या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलातर्फे ब्रॉन्टो स्काय लीफ्ट ही बचाव कार्य करणारी गाडी प्रदर्शनात ठेवली होती. या गाडीचे वैशिष्ठ्य म्हणजे या गाडीला बचाव कार्य करण्यासाठी 54 मीटर उंचीची यांत्रिक शिडी बसवलेली असते. या गाडीचे प्रात्यक्षिक सुरू होताच तेथे उपस्थित विद्यार्थी व जवानांचेही लक्ष वेधले गेले. यामध्ये गाडीसोबत फोटो काढणे शिडीच्या बास्केटमध्ये चढून प्रात्यक्षिक अनुभवणे अशी धमालही जवानांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये ही एकमेव गाडी असून 2013 साली महापालिकेने ही गाडी विकत घेतलेली आहे. उंच इमारतीवर बचाव कार्य करणे, आगीच्या वेळी पाणी फवारणे आदी काम ती प्रभावीपणे करते.