नवी दिल्ली । जगभरात लष्करी सामर्थ्यात महासत्ता असल्याचे अमेरिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. चीन आणि रशियाच्या तुलनेत अमेरिका तीन पट जास्त निधी आपल्या लष्करावर खर्च करतो, तर जागतिक सामर्थ्यात भारत चौथ्या स्थानावर आहे.
लष्करी सामर्थ्याच्या जागतिक श्रेणीमधून ही बाब समोर आली आहे. भारत आपल्या लष्करावर प्रत्येक वर्षी 51 दशलक्ष डॉलर्स इतका निधी खर्च करतो. अमेरिका स्वरक्षणासाठी सुमारे 600 अब्ज डॉलर्स इतका खर्च करीत असतो. तर, रशिया वर्षभरात 54 अब्ज डॉलर्स खर्च करतो. त्याखालोखाल, चीन 161 अब्ज डॉलर्स खर्च करतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर संरक्षण सामर्थ्यावर जास्त भर देणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर लगेच अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पात सुमारे चार अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. इसिसचा धोका लक्षात घेत ट्रम्प यांनी संरक्षण खर्च वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ताज्या जागतिक श्रेणीत 106 देशांचा समावेश आहे. यात संरक्षणावर होणारा खर्च, लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांची संख्या यासह अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे. अमेरिकेकडे 5884 रणगाडे, 19 हेलिकॉप्टर्स वाहून नेणारी विमाने, 13,762 विमाने, 415 युद्धनौका असून, लष्करी जवानांची संख्या 14 लाखांच्या घरात आहे. रशियाकडे 20,215 रणगाडे, एक हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 3794 विमाने आणि 352 युद्धनोका असून, रशियाच्या सैनिकांची संख्या 7,66,055 इतकी आहे.