मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात
नवी दिल्ली : गुजरातमधील 56 लोकांचा बळी घेणार्या 2008 च्या साखळी बॉम्बसफोटातील दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी यास दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सोमवारी पकडले. कुरेशी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, तो बॉम्ब बनविण्यात तज्ज्ञ आहे. भारताचा ओसामा बीन लादेन असे त्याला संबोधले जात होते. दिल्लीतील गाझीपूर येथे झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा कुरेशीचा प्रयत्न होता, अशी शंका दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नेपाळमध्ये होते वास्तव्य
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, कुरेशीकडे आम्हाला एक पिस्तुल आणि काही कागदपत्रे सापडली आहेत. सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीन या संघटना पुन्हा कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात तो होता. कुरेशी बनावट कागदपत्रांच्या आधारे नेपाळमध्ये गेला होता आणि तेथे अनेक वर्षांपासून वास्तव्य करत होता. 2013 आणि 2015 या कालावधीत तो सौदी अरेबियातही गेला होता. तेथून तो भारतात परतला आणि दहशतवादी हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न करत होता.
गुजरातमधील साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवादी
मागील काही वर्षापासून देशातील पोलिस त्याच्या मागावार होते. तो तौकीर या नावानेही ओळखला जातो. बंदी घालण्यात आलेली इस्लिामक मूव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी या संघटनेचा बॉम्ब बनविणारा तज्ज्ञ म्हणून तो ओळखला जातो. 26 जुलै 2008 रोजी साखळी बॉम्बस्फोटांनी गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत हादरले होते. या साखळी बॉम्बस्फोटात कुरेशीने महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याने बाजार, रेल्वे स्टेशन तसेच रूग्णालय अशा गर्दीच्या ठिकाणी टिफिन आणि मोटारसायकलचा वापर करून बॉम्ब ठेवले होते. या साखळी बॉम्बस्फोटांत 56 जणांचा बळी गेला होता. कुरेशी हा तीन मुलांचा पिता असून, त्याने अनेकदा पोलिसांना चकवा दिला आहे. नुकताच तो बांगलादेशमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु तेथूनही तो निसटला होता.
कुरेशी एएनआयच्या हिटलिस्टवर!
बेंगळुरूमध्ये 2014मध्ये घडलेला बॉम्बस्फोट, दिल्लीतील 2010मधील साखळी बॉम्बस्फोट आणि 2006मध्ये मुंबईत झालेल्या लोकलमधील बॉम्बस्फोटप्रकरणी कुरेशी हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टवरील दहशतवादी आहे. 46 वर्षीय कुरेशी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याचे शिक्षण मुंबईत झाले आहे. इंजिनिअर झाल्यानंतर तो सिमीसाठी काम करत होता. कुरेशी कुटुंबीय रोजगारासाठी उत्तरप्रदेशातून मुंबईत आले होते.