भारतीय वायुसेनेतल्या एअर चीफ मार्शल या उच्चतम पदावर असताना अत्युत्तम कामगिरी बजावल्यामुळे मार्शल ऑफ द एअरफोर्स, असा बहुमान मिळवलेले एकमेव वायुसेना अधिकारी, अर्जन सिंह यांना देश कायमचा मुकला आहे! शनिवारी दिल्लीतल्या लष्करी इस्पितळात, वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पूर्व पंजाब प्रांतातल्या लायलपूर या शहरात 1919 साली ते जन्मले. लायलपूर हे त्यांचे जन्मगाव 1947 साली फाळणीनंतर पाकिस्तानात गेले जे आज फैसलाबाद म्हणून ओळखले जाते आणि त्यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण जिथे झाले ते मॉन्टगोमेरी आता साहिवाल म्हणून प्रसिद्ध आहे. अर्जन सिंह यांचे पणजोबा, आजोबा आणि वडीलही सैन्यातच होते. वडील दरबारा सिंह हे ब्रिटिश इंडियन आर्मीच्या घोडदळात होते आणि पहिल्या महायुद्धात त्यांनी फ्रान्समध्ये जर्मनांच्या फौजेशी निकराची झुंज दिली होती. शौर्याचा असा वडिलोपार्जित वारसा लाभलेल्या अर्जन सिंह यांचे लष्करी शिक्षण इंग्लंड मधल्या Cranwell येथे रॉयल एअर फोर्सच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये झाले आणि ते प्रथम पायलट ऑफिसर म्हणून 1939 साली अंबाला येथे रॉयल ब्रिटिश इंडियन एअरफोर्समध्ये दाखल झाले. दुसर्या महायुद्धात त्यांनी बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या हस्ते त्यांना फ्लाइंग क्रॉस बहाल करण्यात आला. 1948 साली ते तेजी सिंह यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्या दाम्पत्याच्या संसारात आशा या नावाची एक सुकन्या आणि अरविंद या नावाचा एक सुपुत्र यांचे आगमन झाल . 1965 च्या भारत – पाक युद्धप्रसंगी अर्जन सिंह हेच भारताचे वायुसेनाध्यक्ष होते. त्यांच्याच धाडसी निर्णयामुळे भारताच्या लढाऊ वैमानिकांनी लाहोरच्या आकाशापर्यंत धडक मारून पाक – हवाई दलाचा थरकाप उडवला होता. अर्जन सिंह यांच्या खंबीर नेतृत्वाची आणि युद्धकौशल्याची दखल घेऊन भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना त्याच वर्षी सन्मानित केले होते. त्याशिवाय त्यांना एअर चीफ मार्शल असा विशेष हुद्दा देऊन एक प्रकारे त्यांची पदोन्नती केली होती. 1969 साली वयाची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर त्याच पदावरून त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली.
अवघ्या दोन वर्षांनंतर 1971 साली त्यांची नियुक्ती स्वित्झर्लंडमधील राजदूत म्हणून करण्यात आली. त्याचवेळी रोमलगतच्या Vatican City चेदेखील राजदूत म्हणून काम त्यांनाच पाहावे लागले. 1974 साली ते पूर्व आफ्रिकेतल्या केनिया देशात राजदूत म्हणून नियुक्त झाले. 1975 ते 1981 या काळात त्यांना सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सन्माननीय आणि उच्चस्तरीय सदस्य म्हणून काम पाहता आले. 1989 च्या डिसेंबरपासून एक वर्षभर ते केंद्रशासित दिल्ली प्रांताचे नायब – राज्यपाल होते. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना 2002 साली त्यांना मार्शल ऑफ द एअरफोर्स हा फिल्डमार्शल – समान विशेष हुद्दा राष्ट्रपती के.आर. नारायणन् यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सन्मान प्राप्त असलेले ते एकमेव हवाई दल प्रमुख आहेत! भूतपूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यासाठी अर्जन सिंह जेव्हा चाकांच्या खुर्चीवर बसून गेले होते तेव्हा ते 96 वर्षांचे होते. अर्जन सिंह यांच्या निधनाने भारतीय वायुदलाचे जणू भीष्म पितामह गेले असेच वाटते!
-प्रवीण कारखानीस
9860649127