भारतीय शेतकरी व मानवजातीचा ’ब्ल्यू व्हेल’ खेळ

0

सध्या बालके व तरूणांनाआत्महत्यांकडे नेणार्‍या ’ब्ल्यू व्हेल’ या खेळामुळे खळबळ माजली आहे. या खेळात एकापाठोपाठ एक टास्क म्हणजे कठीण काम दिले जाते व शेवटचे टास्क आत्महत्या असते. यंत्रवत जीवन जगणार्‍या आधुनिक माणसांच्या मानसिकतेचा अभ्यास करून असाच भयंकर खेळ जगात अर्थव्यवस्थेच्या नावे खेळला जात आहे.

या ब्ल्यू व्हेल मधे देखील एका मागे एक टास्क दिले जाते. खेळाडू बेभान होतो. त्याला जगाचा व वास्तवाचा विसर पडतो. तो भ्रमाला सत्य मानू लागतो. फरक हा की हा खेळ मोठ्या वयाची माणसे खेळतात. ग्रामीण खेळतात. शहरी खेळतात. अशिक्षित खेळतात. उच्चशिक्षित खेळतात. सर्वच खेळतात. कारण तसे त्यांचे प्रोग्रामिंग झाले आहे.

उदाहरणार्थ या खेळाचा भाग असलेली ’हरित क्रांती’ ही खास भारतीय आवृत्ती. ही विशिष्ट पध्दतीने प्रचार करून फार लोकप्रिय करण्यात आली. पहिले टास्क होते शेतीत रासायनिक खते वापरण्याचे. खेळात ओढले जाण्यासाठी ते सोपे होणे आवश्यक होते. म्हणून सुरवातीला ही खते फुकट देण्यात आली. मग पुढचे टास्क, संकरित बियाणे वापरण्याचे. थोडा काळ बियाणेदेखील मोफत दिली गेली. आतापर्यंत खेळाडू खेळात चांगलाच रंगून गेला.मग तोच एकामागे एक कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके, बोअरवेल, विजेचे पंप, ट्रॅक्टर,बी.टी., जी.एम. अशी टास्क पुरी करत गेला. त्यासाठी बँक किंवा सावकारांकडून कर्जे घेत गेला.

त्याला प्रोत्साहन म्हणून आयोजक सूत्रधारांनी धरणे, रस्ते , औष्णिक व जलविद्युत प्रकल्प इत्यादींची व्यवस्था केली. पुढील टास्कमधे गायीगुरांना विकून टाकणे, बांधावरील झाडे विकणे, फक्त नगदी पिके घेणे, प्रक्रिया करणे, निर्यात करणे, याबरोबरच लग्न समारंभ थाटामाटात करणे, गावांत मार्बलची मंदिरे बांधणे, मोटार घेणे अशा हटके टास्कच्याही थ्रिलिंग पायर्या काही खेळाडूंसाठी होत्या.

अर्थात शेवटचे टास्क ’आत्महत्या’. हा खेळ फक्त शेतकऱीच नाही तर पूर्ण आधुनिक म्हणवणाऱी मानवजात खेळतेय. यंत्र आल्यापासून 250 वर्षे ब्ल्यू व्हेल जोरात आहे. या खेळाच्या सूत्रधारांनी अन्न निर्मिती आधी वस्त्र, घरे , वाहतुक यांच्या पध्दती मोडल्या. आगगाडी, कापड गिरण्या, सीमेंट , स्टील ही टास्क झाल्यावर वीज दिवा, सिनेमा, मोटार, विमान, टीव्ही, संगणक, नेट, मोबाईल, जनुक तंत्रज्ञान, अंतराळ प्रवास, रोबोटिक्स अशी एकामागे एक टास्क पुरी करताना आपण हे का करतोय, याचे परिणाम काय होताहेत, याकडे बेहोश तरूणांप्रमाणे मानवजातीचेही लक्ष नाही. आता ऐन पावसाळ्यात, विदर्भ – मराठवाड्यात शेतजमिनीला उन्हाळ्याप्रमाणे तडे आहेत.* शेतकरी पावसाळ्यातीलही ऊन सहन करू शकत नाही. जलयुक्त शिवार योजनेच्या तळ्यांत पाणी नाही. तंत्रज्ञान आपल्याला वाचवेल या भ्रमात लोक आहेत. पृथ्वी वेगाने तापत आहे. अवर्षण उष्णतेच्या लाटा, अवकाळी, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, महापूर, वणवे, वादळांचे थैमान जगभर एकाच वेळी चालू आहे. प्रत्येक वर्षी 600 कोटी टन कार्बन डायऑक्साईड वायूची अधिकची भर वातावरणात पडत आहे. कोट्यावधी वर्षांत न घडलेली गोष्ट घडत आहे. 5 वर्षांत 1ओसे या अभूतपूर्व वेगाने पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ सुरू झाली आहे. पॅरिस करार’ मानवजातीला वाचवू शकणार नाही. यंत्र येण्याच्या वर्षाच्या तुलनेत 2ओसे ची वाढ फक्त पुढील 3 ते 5 वर्षांत होईल. मानवजातीच्या उच्चाटनाची घंटा वाजेल.
अ‍ॅड. गिरीश राऊत- 9869023127