मुंबई। भारतीय क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध घेणार्या बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला अर्ज करण्यास सांगितले असल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना दुसरी टर्म देण्यास बीसीसीआय तयार नसल्यामुळे प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपर्यंतच कुंबळे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सेहवागला या पदासाठी अर्ज करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. आयपीएल सामन्यादरम्यान सेहवागला या अधिकार्याने अर्ज करण्यास सांगितले होते. यासंदर्भात विचारले असता, प्रशिक्षकपदासाठी अद्याप कोणीही अर्ज केला नाही असे विरेंद्र सेहवागने सांगितले आहे.
कुंबळेच्या मार्गदर्शनात विविध कसोटीत यश
प्रशिक्षकपदाच्या सेहवाग एकटाच शर्यतीत नसले. अन्य माजी क्रिकेटपटू देखील यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. क्रिकेटपटू आणि स्वत:च्या पगारात मोठी वाढ करण्याची मागणी केल्यामुळे बीसीसीआय अनिल कुंबळे यांच्यावर नाराज झाल्याचे कळते. त्यामुळेच बोर्डाने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर 13 पैकी 10 कसोटीत विजय मिळवला. भारतीय संघाचे सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अनिल कुंबळे यांची 23 जून 2016मध्ये प्रशिक्षकपदी नियुक्त झाली होती. कुंबळे यांच्या काळात भारतीय संघाने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्टेलिया यांच्याविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवला आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. कसोटीसह न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील भारताने विजय मिळवला होता.