भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध डे-नाईट कसोटी खेळणार; बीसीसीआयची घोषणा !

1

नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड संघाचा दौरा सुरु आहे. टी-२० नंतर वन डे आणि आता कसोटी मालिका सुरु आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी वन डे मालिका खेळणार आहे. पण, या वर्षाच्या अखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे टीम इंडिया डे-नाईट कसोटी सामना खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली आहे. महिनाभरापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खेळाडू ऑस्ट्रेलियात दिवस रात्र कसोटी खेळण्यासाठी तयार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया डे-नाईट कसोटी खेळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

भारतीय संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नोव्हेंबर 2020मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2021मध्ये इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर योणार आहे. या दोन्ही मालिकेत टीम इंडिया डे नाईट कसोटी खेळणार आहे.

भारतीय संघानं नोव्हेंबर 2019मध्ये कोलकाता येथील इडन गार्डनवर पहिला दिवस रात्र कसोटी सामना खेळला होता. बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता.