भारतीय संविधान दिनानिमीत्त रॅली

0

पुणे । समता, स्वतंत्र, बंधुत्व म्हणजे संविधान, विविधतेतील एकता म्हणजे संविधान, संविधान आहे महान सर्वाना हक्क समान अशा विविध घोषणा देत संविधानाचा उत्साहात नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 68 व्या भारतीय संविधन दिनानिमीत्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

संविधानामुळे भारतातील लोकशाही टिकून आहे. या संविधानाचा सन्मान राखण्यासाठी संविधान सन्मान रॅलीचे आयोजन संविधान सन्मान समिती आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध पक्षातील नेते मंडळी यानिमित्ताने उपस्थित होती. धार्मिक, राजकीय झेंडे बाजूला ठेवून सर्वजण रॅलीत सहभागी झाले होते. ज्या महात्मा फुले वाड्यातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेचा संदेश दिला या समता भूमीपासून रॅली मार्गस्थ झाली. याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे परशुराम वाडेकर, नगरसेवक अविनाश बागवे, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, माजी आमदार कमल ढोले-पाटील, बाळासाहेब जानराव, रोहिदास गायगवाड, अशोक शिरोळे, महेंद्र कांबळे, अयूब शेख आदी उपस्थित होते. यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली. संविधानाच्या उद्यशिकांचे वाचन झाल्यानंतर दुपारी रॅलीला सुरुवात झाली.

संविधान उद्देश पत्रिकेचे वाटप
संविधान उद्देश पत्रिकेचे वाटपही या निमित्ताने करण्यात आले. डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून शाळेतील मुले मुली सहभागी झाले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रॅली स्टेशन परिसरातील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली पोहचली. येथे विविध धर्मातील धर्मगुरूंचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.