पुणे । भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे दर्शन व कल्याणमय कृती आहे. हजारो वर्षांचा मानवी संस्कृतीचा इतिहास लिहिला गेला आणि पुढील काळातही लिहिला जाईल. त्यात विश्वशांती व मानवतेच्या कार्यासाठी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृह कलशारोहणाचाही समावेश असेलच, असे मत संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी केले.
एमआयटी विश्व शांती विद्यापीठ, पुणे व विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्वराजबागमध्ये विश्वशांती आणि मानवतेचे प्रतीक असलेल्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृहाचा कलशारोहण समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते. या कलशारोहणाची विधीवत पूजा श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, श्री महंत हेमंतपुरी महाराज, महंत डॉ. राघवेश दास वेदांती, हभप तुळशीरामकराड व ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी केली. यावेळी पं. वसंत गाडगीळ, शेख बशीर अहमद बियाबानी, अनीस चिस्ती, डॉ. एडिसन सामराज, सरदार राजिंदरसिंग कंडा, भंते नागघोष, हभप बाळासाहेब बडवे, शाहू मोडक यांनी शुभाशीर्वाद दिले. बापूसाहेब मोरे, ज्येष्ठ पत्रकार, तत्त्वज्ञ व विचारवंत फिरोज बख्त अहमद व गोविंद ढोलकिया उपस्थित होते.
54 विभूतींचे पुतळे; 60 हजार चौरस फुटांचे ग्रंथालय
डॉ. भटकर म्हणाले, इतिहासाच्या आधारेच मानवी संस्कृतीची निर्मिती होत असते. या वास्तूच्या कलशारोहणाला खूपच महत्त्व असून ते भारतीय व मानवी संस्कृतीचे एक प्रतीक ठरेल. धर्म, विचारवंत, विज्ञान, संस्कृती, तत्त्वचिंतनशील अशा ग्रंथांचा समावेश असणार आहे. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण हा घुमट मानवकल्याणसाठी महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून विश्वात शांती नांदण्याचे कार्य होईल यात किंचितही शंका नाही. 54 विभूतींचे पुतळे बसविण्यात आले आहेत. येथे 60 हजार चौरस फुटांचे ग्रंथालयही असेल. वेदप्रताप वैदिक म्हणाले, येथे निर्माण केलेल्या घुमटामध्ये सर्वधर्मांचा कुंभ तयार झाला आहे. ससीत पासून असीत होण्याचा मार्ग येथे सापडतो. येथे ज्ञान साधनेसाठी सकारात्मक उर्जा मिळते.
जागतिक पर्यटन स्थळ बनेल
अहमद म्हणाले, येथे उभारलेला सर्वात मोठा घुमट हा जागतिक पर्यटन स्थळ बनेल. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्स्फर या गोष्टींचे उदाहरण येथे पाहावयास मिळते. मोरे म्हणाले, विज्ञानाच्या युगात प्रत्येकाला शांतीची गरज आहे. मानवाला खरी शांती कशात आहे, याची ओळख करून देण्याचे कार्य केले आहे. विज्ञानाच्या माध्यमातून अध्यात्माला अधिक प्राधान्य दिले आहे. डॉ. पठाण म्हणाले, मानवी संस्कृतीला शांतीची खूपच गरज आहे. या कार्याचे बीज वारकरी संप्रदायात दडलेले आहे. शिक्षणाचा मूळ उद्देश राष्ट्रीय एकात्मता आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार शिक्षणामुळे चांगला माणूस घडला पाहिजे. डॉ. राजेंद्र शेंडे व बाळासाहेब बडवे यांनी हा घुमट विश्वशांतीसाठी महत्वाचे कार्य करील असे सांगितले.