भारतीय हवाईदलाने पाकचा दावा फेटाळला

0

नवी दिल्ली । भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या वृत्तानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी चवताळलेल्या पाकने भारताची कुरापत काढण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने सियाचीनजवळ स्कर्दू भागात भारतीय सैन्याच्या लढाऊ विमान उडवल्याचा दावा पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी केला. मात्र, भारतीय हवाईदलाने पाकिस्तानचा हा दावा फेटाळला आहे. पाकिस्तानी वायुसेनेने मिराज हे जेट फायटर विमान सियाचीनजवळ स्कर्दू भागात बुधवारी सकाळी उडवल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानी लष्कराने आपल्या सर्व लष्करी हवाई तळांना सज्जतेचे आदेश दिले असल्याचा दावाही पाक माध्यमांनी केला आहे. मात्र, भारतीय हवाईदलाने पाकचा हा दावा फेटाळला आहे. भारतीय हद्दीतून असे कोणतेही लढाऊ विमान उडवण्यात आले नसल्याचे हवाईदलाने म्हटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सीमेलगत असलेले पाकिस्तान हवाईदलाचे सर्व ऑपरेटिंग बेसेस कार्यान्वित करण्यात आले आहेत. मिराज विमानाचे उड्डाण हे याचेच संकेत मानले जात आहेत. पाकिस्तानी हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्कर्दूतील हवाईतळाला भेट दिल्याचेही म्हटले जातं आहे. मंगळवारी भारतीय सैन्याने नौशेरा सेक्टरजवळील पाकिस्तानी चौक्यांवर मोठी कारवाई करत त्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. विशेष म्हणजे भारतीय लष्कराने या कारवाईचा एक व्हिडिओही जारी केला.

22 सेकंदांचा व्हिडिओ
भारतीय लष्कराने जारी केलेला व्हिडिओ 22 सेकंदांचा आहे. तोफगोळे डागल्यामुळे निर्माण झालेला धुराळ्यात पाकिस्तानी सीमेतील चौक्या नेस्तनाबूत होत असल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळते. या कारवाईत भारतीय सैन्याने रॉकेट लाँचर, रणगाडे विरोधी लेसर गाइडेड मिसाइल्स, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर्सचा वापर केला.

शांततेसाठी कारवाई
सीमेलगत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशी कारवाई करणे आवश्यक असल्याचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्ाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य याआधीपासून अशा स्वरूपाच्या कारवाई करत आहे. भारतीय सैैन्याच्या या कारवाईंना सरकारचा पाठिंबा आहे, असे जेटली म्हणाले.

पाकिस्तानने दावा फेटाळला
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स विभागाचे संचालक असिफ गफूर यांनी ट्विट करून भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्या नष्ट केल्याचा तसेच नियंत्रण रेषेजवळील भारतीय नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. भारताचा दावा खोटा असून त्यात काही तथ्य नसल्याचे गफूर म्हणाले.

पाकचा असाही दावा
भारताने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने उत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारतीय सैनेच्या चौक्या नष्ट केल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात असिफ गफूर यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. 28 सेकंदांच्या या व्हिडिओत चौक्यांप्रमाणे दिसणारे बांधकाम बॉम्बस्फोटामुळे नष्ट होत असल्याचे पहायला मिळते. पण हा व्हिडिओ पाकिस्तानचा एक बनाव असून, त्याकरिता त्यांनी स्वत:च्याच चौक्या नष्ट केल्याचे बोलले जात आहे.