मलेशिया । सुलतान अझलन शहा कप स्पर्धेत भारतीय हॉकी टीमने न्यूझीलँडचा दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या संघावर वर्चस्व राखत 3-0 च्या फरकाने विजय मिळविला. अझलन शहा कप स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच विजय आहे. खेळ सुरू झाल्यावर भारतीय संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली. त्यामुळे न्यूझीलँडच्या संघाला सामन्यात परत येण्याची संधीच मिळाली नाही.
मंदीप सिंह यांनी भारताकडून पहिला गोल केला. त्यानंतर 37 व्या मिनिटाला हरजीत सिंहने दुसरा गोल केला आणि सामना संपण्याआधी 12 मिनिटात तिसरा गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने दाखविलेल्या सांघिक कामगिरीमुळे न्यूझीलँडच्या संघाला संपूर्ण सामन्यात डोकं वर काढता आले नाही. या स्पर्धेत या आधी शनिवारी भारतीय संघानं राऊंड रॉबिन सामन्यात ब्रिटेनबरोबर 2-2 ने सामना अनिर्णित सोडला होता. या सामन्यातही भारताकडून मंदीप सिंहने दोन गोल केले होते. तर ब्रिटेनकडून टॉम कार्सन आणि अॅलन फोर्सिथने गोल केले होते. दोन्ही संघाने एकमेकांना जोरदार टक्कर दिली होती.