पुणे। डॉक्टरांवरील हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नसून, बुधवारी पुन्हा पुण्यात व धुळ्यामध्ये डॉक्टरांवर हल्ले झाले. पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू असताना रुग्ण दगावल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत डॉक्टरांना शिवीगाळ केली. खुर्च्या फेकून डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पहाटे झालेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी रात्री दोघांना अटक केली. या घटनांमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पांडुरंग लक्ष्मण खळदकर व राहुल लक्ष्मण खळदकर (रा. आंबेगाव पठार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रविण रघुनाथ जाधव (वय 41, रा. धनकवडी) हे भारती विद्यापीठ रुग्णालयात ऑफीस सुपरीडंट म्हणून नोकरीला आहेत. पाडुरंग आणि राहुल यांची आई मंदा खळदकर (वय 58) यांच्या पोटात दुखणे व घाम येत असल्यामुळे त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी योग्य उपचार तसेच चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, डॉ. श्रीराज पवार यांना शिवीगाळ करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एक डॉक्टर या घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडोओ शुटींग करत होते. हे मृत रुग्णाच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी जास्तच गोंधळ घालत डॉक्टरांना खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तर, बाहेर भेटा तुम्हाला बघून घेऊ, अशा धमक्याही दिल्याचे, जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. अटक झालेल्या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.