भारत ‘अ’ संघाचा अफगाणवर 7 गड्यांनी विजय

0

प्रेटोरिया । येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाने अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. अफगाण अ संघाचा डाव प्रथम फलंदाजी करताना 40.5 षटकांत 149 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युतरादाखल खेळणार्‍या भारत अ संघाने विजयासाठीचे आव्हान 30.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. अर्धशतकी खेळी करणार्‍या करुण नायरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय कर्णधार मनीष पांडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय गोलंदाजानी सार्थ ठरवताना अफगाण अ संघाला 149 धावांत गुंडाळले. भारतातर्फे अक्षर पटेल व विजय शंकर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. युजवेंद्र चहलने 2 तर सिद्धार्थ कौल व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

विजयासाठीचे 150 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारत अ संघाचे सलामीवीर श्रेयस अय्यर (20), संजू सॅमसन (10) झटपट बाद झाल्याने भारतीय संघाची 2 बाद 54 अशी स्थिती झाली होती. मात्र, करुण नायर व कर्णधार मनीष पांडे या जोडीने तिसर्‍या गडयासाठी 67 धावांची भागीदारी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. करुण नायरने अर्धशतकी खेळी साकारताना 83 चेंडूत 6 चौकारासह 57 धावा फटकावल्या. मनीष पांडने 5 चौकारासह नाबाद 41 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंतनेही नाबाद 17 धावा फटकावल्या. मालिकेत भारतीय संघाचे दोन सामन्यात पाच गुण झाले आहेत. भारताची पुढील लढत दि. 1 ऑगस्ट रोजी अफगाण अ संघाविरुद्ध होईल.