भारत आजही विजयाचे सातत्य राखणार!

0

सेंच्युरियन । विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ बुधवारी द.आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळेल. या मालिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळलेला पहिला सामना भारताने 28 धावांनी जिंकला होता. मालिकेत 1-0 अशी घेतलेली आघाडी वाढवण्यासाठीच बुधवारच्या सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरेल. कोहली सेना सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. मागील सामन्यात सर्वाधिक 72 धावा करणार्‍या शिखर धवनने रोहित शर्मासग संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. याशिवाय स्वत: कोहली आणि मनिष पांडेनेही चांगली कामगिरी केली. सामन्यात भारतीय फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे भारतीय फलंदाज दुसर्‍या सामन्यात मोठी धावसंख्या उभारतील, अशी आशा आहे.

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी (विकेट्किपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, अक्शर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रित बुमराह, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर.
दक्शिण आफ्रिका – जे पी ड्युमिनी (कर्णधार), फरहान बेहरदीन, ज्युनिअर डाला, रीझा हेंड्रिक्स, क्रिस्टीयन जाँकर, हेनरिक क्लासेन (विकेट्किपर), डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पॅटरसन, एरॉन ्फांगिसो, अंदिले फेहुलकवायो, तबरेझ शम्सी, जॉन जॉन सम्ट्स.

अ‍ॅबी डिविलियर्सची भासणार उणीव
आफ्रिकेला दुसर्‍या सामन्यात अ‍ॅबी डि विलीयर्सची उणिव भासणार हे नक्की आहे. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरी होईल. सहाव्या एकदिवसीय सामन्यात डिविलीयर्स जखमी झाला होता. त्यामुळे त्याला टी 20 मालिकेला मुकावे लागले. त्यामुळे संघाला समाधानकारक धावा करुन देण्यासाठी फलंदाजांना मेहनत करावी लागणार आहे. गोलंदाजांचा विचार केला तर पहिल्या सामन्यात ज्युनिअर डालाने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या होत्या. ख्रिस मॉरिस, डेन पॅटरसन आणि तबरेझ शम्सीला छाप पाडता आली नाही. पहिल्या सामन्यातून डालाने टी 20 क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. संघातील युवा खेळाडुंच्या जोरावर विजय मिळवता येणार नाही, हे ड्युमिनीने मान्य केले आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा करण्यापासून रोखणारी रणनीती यजमानांच्या गोलंदाजांना आखावी लागेल.

गोलंदाजीत एकट्या भुवनेश्‍वरकुमारने यजमान संघाच्या फलंदाजांना चांगलेच हैराण केले आहे. मागील सामन्यात त्याने एकाच षटकात तीन विकेट्स मिळवत सामन्याचे चित्रच पालटले. उरलेली कसर नंतर हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल आणि जयदेव उनाडकटने भरून काढली. त्यामुळे एकत्रित कामगिरीचा विचार केला, तर दुसर्‍या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. दुसरीकडे पहिल्या सामन्यातील पराभवामुळे यजमान संघाचा कर्णधार जे. पी. ड्युमिनीने नाराजी व्यक्त केली होती. आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली नसल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. पहिल्या सामन्यात यजमान संघाच्या रीझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या होत्या. हा अपवाद वगळता कर्णधार ड्युमिनी, डेव्हिड मिलरही धावा करण्यात अपयशी ठरला होता.