मुंबई । देशामध्ये बलात्कार आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षांहून अधिक काळ उलटला असून देखील त्यांच्या मारेकर्यांचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या तपास यंत्रणेच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, उदारमतवादी लोक आपल्या देशात येण्यास घाबरतात. कारण त्यांना इथले वातावरण पोषक नसल्याचे माहीत आहे. जगभरात भारताची प्रतिमा गुन्हेगारी व बलात्काराचा देश, अशी तयार झाली आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सांगितले. 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, तर 16 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये गोळीबार हत्या करण्यात आली. दाभोलकर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, पानसरे यांच्या हत्येचा तपास सीआयडीमार्फत सुरु आहे. दाभोलकर व पानसरेंच्या हत्येला 3 वर्षाहून अधिक काळ उलटूनही खरे मारेकरी पोलिसांना सापडलेच नाहीत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली, मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. राज्यामधील उदारमतवादी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हे असुरक्षित आहे. त्यामुळे देशातील कोणतीही संस्था हल्ल्यांपासून सुरक्षित नाही. यात न्यायपालिकाही आली, असेही न्यायालयाने सांगितले.