सिक्कीम । भारत-चीन या दोन्ही देशांमधील संघर्ष आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही देशांकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. सिक्कीम-भूतान-तिबेट ट्राय जंक्शनवरून भारत आणि चीन या देशांमधील तणाव कायम असतानाच याचे पडसाद भारत-चीन सीमारेषेवरही दिसून येत आहे. दोन्ही देशांकडून सीमारेषेवर 3-3 हजार जवान तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारतचीन व भूतानच्या सीमा एकत्र येतात त्या ट्राय जंक्शनवर नेहमीच जवान तैनात असतात. पण डोंगलांगमधील घटनेनंतर उभय देशामध्ये तणाव निर्माण झाला आहे. तसेच दोन्ही देशांचे सैन्य मागे हटण्यास तयार नाही. ध्वज बैठकीनंतरदेखील हा तणाव कमी होऊ शकलेला नाही, अशी माहिती मिळते आहे. यामुळेदेखील हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चीनचा भूतानवरही दबाव
चीन डोंगलांगमध्ये क्लास 40 रस्त्याचे बांधकाम करत आहे. या रस्त्यावरून चीनच्या सैन्याचे 40 टनपर्यंत वजनाचे वाहन जाऊ शकणार आहेत. यामध्ये रणगाडे, तोफा यांचा समावेश आहे. भूतानने डोंगलांगमधील भागातील ताबा सोडावा यासाठी चीन भूतानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. भूतानने यापूर्वीच जकुर्लंग आणि पासामलंग या भागातील 395 किलोमीटरच्या भूभागावरून ताबा सोडला होता. रस्त्याच्या बांधकामावर भूताननेही आक्षेप घेतला आहे.
म्हणून जवान केले तैनात
सिक्किममधील डोंगलांग भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला भारताने आक्षेप घेतला होता. यावरून दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी पडली. सिक्कीममध्ये भारत-चीन व भूतान यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथे भारताचे काही जुने बंकर होते. हे बंकर बुलडोझरचा वापर करून चीनच्या सैनिकांनी उद्ध्वस्त केले होते. यामुळे भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गंगटोकमधील 17 माऊंटन डिव्हिजन आणि कलिमपोंगमधील 27 माऊंटन डिव्हिजनचा दौरा केला.
चीनवर बारीक लक्ष
दुसरीकडे भारतीय सैन्य डोंगलांगमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून हा प्रदेश सिलिगूडी कॉरिडोरच्या जवळ आहे. धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी हा प्रदेश महत्त्वाचा असून चीनला रोखण्यासाठी सिलीगूडी कॉरिडोरमध्ये भारतीय सैन्याने भर दिला आहे. तसेच चीनवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे.