भारत-चीन मागे हटणार!

0

नवी दिल्ली/बीजिंग : डोकलाम हा वादग्रस्त भाग भूतानचा असल्याचा दावा भूतानने पुन्हा एकदा केल्यानंतर डोकलाम प्रश्नावरून भारत व चीन या दोन मोठ्या राष्ट्रांत युद्धाचे सावट निर्माण झाले आहे. तथापि, याप्रश्नी युद्ध टाळण्यासाठी भारताने चीनसमोर ठेवलेली अट मान्य करण्यास चीनने तयारी दर्शविली आहे. वादग्रस्त सीमेवरून चीनचे सैन्य 100 मीटर मागे सरकेल तर भारताचे सैन्यही पूर्वी होते तेथे म्हणजे काही किलोमीटर मागे येईल, असा तोडगा काढण्यात आल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांनी दिले आहे. चीन डोकलाममधून काहीअंशी मागे हटण्यास तयार झाल्याने भारताच्या कूटनैतिक व्यूहरचनेचा तो विजय असल्याचेही बोलले जात आहे. गुरुवारपर्यंत चीनने वादग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले होते. तसेच, 80 तंबूदेखील गाडले होते. भारतासोबत युद्धाची उलटगणती सुरु झाल्याची दर्पोक्तीही चीनच्या शासकीय प्रसारमाध्यमांनी चालवली होती.

दोन्ही देशांना हवा सन्मानजनक तोडगा
डोकलाम सीमा हा भूतानचा भाग असून, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय लष्करावर आहे. त्यामुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने डोकलामपासून 250 मीटर मागे जावे, अशी सूचना भारतीय लष्कराच्यावतीने चीनच्या लष्कराकडे केली होती. त्यासाठी कूटनैतिक पातळीवर चर्चाही झाली होती. दोन्ही बाजूने जोरदार युद्धाची तयारी झाली असून, कोणत्याहीक्षणी युद्ध पेटण्याची शक्यता पाहाता, वादग्रस्त सीमेपासून 100 मीटर मागे सरण्यास चीनने तयारी दर्शविली आहे. तथापि, भारतीय लष्करानेही आपल्या मूळ जागी म्हणजे किलोमीटरभर मागे जावे, असा चिनी सैन्याचा हट्ट आहे. त्यावर तूर्त बोलणी सुरु होती. डोकलाम सीमेवर निर्माण झालेला तणाव पाहाता, दोन्ही बाजूंनी सद्या गावे खाली करण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, याप्रश्नी सन्मानजनक तोडगा निघाल्यास त्याची चाचपणी दोन्ही देश करत आहेत.

चीनचे एक पाऊल मागे!
गुरुवारी सकाळी चीनने वादग्रस्त डोकलाम भागात 80 तंबू गाडले होते. चिनी सैन्याची ही मोठी तयारी मानली जात आहे. तर या भागात भारताने 350 सैन्यांना तैनात केले असून, जवळपास 30 तंबू ठोकले गेले आहेत. तर भारतीय लष्कराला कोणत्याहीक्षणी युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश आहेत. आता चीनने 100 मीटर मागे सरकण्याची तयारी दर्शविल्यानंतर तणाव निवळण्याची शक्यता आहे. कालच चिनी मीडियाने युद्धाची उलटगणती सुरु झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज एक पाऊल मागे टाकून चीनने युद्ध टाळण्याचा प्रयत्न चालविला आहे.