नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपसात चर्चा करून त्यांच्यातला सीमा प्रश्न मार्गी लावावा असा सल्ला अमेरिकेने दिला आहे. भारत आणि चीन यांच्यातला तणाव कमी करण्यासाठी या दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी समोरासमोर येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे, यामध्ये कोणतीही सक्ती किंवा दबाव नको असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या गेरी रोस यांनी म्हटलं आहे. थेट चर्चा करून या दोन्ही देशांनी तणाव निवळेल असे वातावरण तयार केले पाहिजे यातच दोन्ही देशांचे हित आहे, असेही रोस यांनी स्पष्ट केले आहे.
चीन म्हणतंय डोक्लाम हा आमच्याच राष्ट्राचा भाग
डोक्लाममध्ये चीनच्या लष्करानं घुसखोरी केल्यापासून भारत आणि चीन यांच्यातला सीमा प्रश्न चिघळला आहे. आता चीनने याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत भारताविरोधात लढाई पुकारू असेही म्हटले आहे, या सगळ्यानंतर अमेरिकेने लढाई हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नसून दोन्ही देशांनी चर्चेने हा प्रश्न सोडवावा, असे म्हटले आहे. संसदेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीननं घुसखोरी केली असून त्यांनी सैन्य मागे घ्यावे असे म्हटले होेते. ज्यानंतर सुषमा स्वराज खोटारड्या असल्याची टीका चीनने केली होती आणि डोक्लाम हा आमच्याच राष्ट्राचा भाग आहे असेही स्पष्ट केले होते.
अमेरिकेकडून एका अहवालात आझाद काश्मीरचा उल्लेख
19 जुलै रोजी अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने एक अहवाल सादर केला आहे. कंट्री रिपोर्ट ऑन टेरिरिझम असे या अहवालाचे नाव आहे. या अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख आझाद कश्मीर, असा करण्यात आला आहे. या भागाचा उपयोग भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या अहवालाची माहिती जेव्हा भारताला मिळाली त्यानंतर भारताने अमेरिकेच्या या अहवालाचा निषेध केला आहे.