भारत-चीन युद्धाच्या उंबरठ्यावर!

1

बीजिंग : सिक्किम भागात सीमेवरून भारत व चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव संपुष्टात आला नाही तर युद्ध अटळ आहे, अशी भूमिका चिनी विचारवंतांनी व्यक्त केली आहे. आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी बीजिंग पूर्णपणे सक्षम असून, त्यासाठी युद्ध छेडावे लागले तरी चीन मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिकी चिनी तज्ज्ञांनी चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल्स टाईम्सद्वारे व्यक्त केली आहे. भारत व चीनमध्ये सद्या डोकलाम क्षेत्रात सलग तिसर्‍या आठवड्यात सीमारेषेवरून तणाव कायम आहे. दोन्ही बाजूचे सैन्य समोरासमोर उभे ठाकलेले आहे. सरकारी वृत्तपत्र हे सरकारचे ‘थिंक टँक‘ समजले जाते. त्यामुळे या वृत्तपत्रातील भूमिका भारतासाठी चीनची दिशा स्पष्ट करणारी आहे. जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सुमारे 3,488 किलोमीटरची सीमारेषा ही चीनला लागून असून, 220 किलोमीटरचा भूभाग हा सिक्कीम सेक्टरचा भाग आहे.

बिघडलेल्या संबंधांबाबत चिंता
सिक्किम येथे चीनच्या लष्कराने नुकतेच भारतीय बंकर उद्ध्वस्त केले होते. शिवाय, भारताने घुसखोरी केली असा कांगावाही चीनकडून सुरू आहे. तर चीनच भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचा दावा भारताने केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर तर चीनचा आणखी तीळपापड झाला आहे. दोन्ही देशांच्या बिघडलेल्या संबधांबाबत चीनमधील विचारवंतांनी चिंता व्यक्त केली असून, हा दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त दिवस चालणार्‍या वादांपैकी एक आहे. हा वाद मिटला नाही, तर दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटू शकते, असे त्यांचे मत आहे.

युध्दाची धमकी
ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रात म्हटले आहे की, चीन कुठल्याही परिस्थितीत आपले सार्वभौमत्व टिकून ठेवेल. आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी प्रसंगी चीन युद्ध करेल. युद्धाची भाषा करणार्‍या ग्लोबल टाईम्सने संवादाचादेखील पर्याय सूचवला आहे. दोन्ही देशांनी विकासावर लक्ष केंद्रीत करावे. भारत आणि चीनने वादांकडे लक्ष न देता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. भारत आणि चीनमधील संबंधांचा फायदा अमेरिकेसारख्या देशाला होईल. भारताने शत्रुत्वाची भावना टाळून चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित केल्यास ते दोन्ही देशांसाठी चांगले असेल, असे भारत-चीन संबंधांचे अभ्यासक झाओ गानचेंग यांनी म्हटले आहे.

1962 च्या इशाराला प्रत्युत्तर
भारताने 1962 मधील पराभव विसरु नये, असा इशारा काही दिवसांपूर्वी चीनने दिला होता. चीनच्या या इशार्‍याला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी रोखठोक उत्तर दिले होते. भारत आता 1962 सारखा राहिलेला नाही, असे जेटली यांनी चीनला सुनावले होते. जेटली यांच्या या विधानालाही चीनमधील रणनीतीतज्ज्ञ वांग देहूआ यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, चीनदेखील 1962 सारखा राहिलेला नाही.