नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन संबंध कमालीचे ताणले गेले आहे. गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केल्याने तणाव वाढला. चीनने भारतीय सैनिकांवर आक्रमण केली, त्यात भारतीय जवान शहीद झालेत. दरम्यान आता पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात प्रचंड तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. या भागातील नाजूक स्थिती लक्षात घेता लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज गुरुवारी ३ सप्टेंबरला सकाळी लडाखमध्ये दाखल झाले.
पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने २९-३० ऑगस्टच्या रात्री अचानक या भागात घुसखोरी करुन एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळून लावला.
त्याचवेळी भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने म्हणजेच SFFने दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. त्यामुळे रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताचे नियंत्रण आहे. फक्त २९-३० ऑगस्टच्या रात्रीच नव्हे, त्यानंतरही चीनने घुसखोरीचे प्रयत्न केले. पण भारतीय सैन्याने प्रत्येकवेळी त्यांचा डाव हाणून पाडला.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी सैन्य काही भागातून मागे फिरले. पण पँगाँग टीएसओ परिसर त्यांनी सोडला नव्हता. त्यामुळे या भागात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. आता तीच स्थिती निर्माण झाली आहे.