दुबर्ई । कर सवलत न मिळाल्यास भारताला 2021 साली होणार्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदावर पाणी सोडावे लागणार आहे. आयसीसीने सवलत न मिळण्याची शक्यता गृहीत धरून भारतीय प्रमाणवेळेशी जवळ असलेल्या नवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार करसवलत देत नसल्याच्या मुद्दावर नवीन वर्षातील आयसीसीच्या पहिल्या बैठकित चर्चा झाली होती.
दरम्यान करसवलत मिळण्याबाबत भारतीय प्रशासनाकडून अद्याप कसलेही संकेत मिळाले नसले तरी बीसीसीआयच्या माध्यमातून सरकारशी चर्चा करणार असणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीचा प्रवक्ता म्हणाला की, आयसीसी आणि बीसीसीआयने अनेक प्रयत्न करुनही भारतात होणार्या स्पर्धेसाठी केंद्र सरकारने कुठलीही करसवलत दिलेली नाही. जगात इतरत्र कुठल्याही मोठ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी करसवलत दिली जाते. बीसीसीआयच्या मदतीने या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याशिवाय वेगळा पर्यायही शोधत आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करसवलत न मिळाल्यास आयसीसीला सुमारे 10 कोटी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागेल. मागील डिसेंबर महिन्यात आयसीसीने बीसीसीआयला देण्यात आलेल्या 2021 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 मधील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची घोषणा केली होती.