पिंपरी : भारत देश हा सुसंपन्न, जैवविविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात विपूल प्रमाणात वनस्पती व प्राणी आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेप व पुरेशा देखभालीअभावी भारत देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. प्राणी, वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. लोकसंख्येचा विस्फोट हे त्यामागील प्रमुख कारण आहे. विकासासाठी वनसंपदेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, असे मत विभागीय वनाधिकारी (विभाग पुणे) शिवाजीराव फटांगरे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 19 मार्च या कालावधीत भीमाशंकर अभयारण्यात दोन दिवसीय विद्यापीठस्तरीय जैवविविधता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या शिबिरात नगर, नाशिक, पुणे विभागातील 105 विद्यार्थी सहभागी झाले होेते.
वन परिसर पाहण्याची संधी
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन परिसर, वनसंपदा पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचा मानचिन्ह असणारा प्राणी शेकरू, राज्याचे निसर्ग मानचिन्ह असणारे फुलपाखरू ब्लू मॉरमॉन, चिमुकली मधमाशी, महाकाय अॅटलास पतंग, हरणटोळ ते सळसळणार्या नागफणी अशा वनसंपदेची प्रत्यक्ष पाहणी विद्यार्थ्यांनी केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर या धार्मिकस्थळालादेखील भेट दिली.
संयोजनात यांचा हातभार
या शिबिराचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिरासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मानववंशशास्त्र विभागप्रमुख डॉ. राम गंभीर, विभागीय वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे, वनपाल तुषार ढमढेरे, वननिरीक्षक अधिकारी श्रीशैल पाटील, किशोर पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळप्रमुख प्रा. मुकेश तिवारी, प्रा. गणेश फुंदे, प्रा. शरद बोडके, प्रा. अर्चना ठुबे, प्रा. मीनल भोसले, प्रा. अंजली अकिवटे यांनी संयोजनात हातभार लावला.