भारत-नेपाळ बस सेवेचे उद्घाटन

0

नवी दिल्ली-मागचे दहा दिवस कर्नाटकात प्रचार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नेपाळमध्ये दाखल झाले. जनकपूर शहरातून त्यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मागचे दहा दिवस कर्नाटकात जोरदार प्रचार केल्यानंतर आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नेपााळमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी भारत-नेपाळ बस सेवेचे उद्घाटन केले.

१५  ऐतिहासिक स्थळ

नेपाळमधले जनकपूर हे सीतेचे जन्मगाव ते उत्तर प्रदेशातील अयोध्या या मार्गावर बससेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या उपस्थितीत झाले. रामायण सर्किट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना जोडणारी धार्मिक पर्यटन अशी ही कल्पना असून तिचे  उद्घाटन मोदींनी केले आहे. अयोध्या, नंदीग्राम, श्रींगवेरपूर आणि चित्रकूटसारख्या १५  ऐतिहासिक स्थळांचा समावेश या रामायण सर्किटमध्ये असेल अशी माहिती आहे.

तिसऱ्यांदा नेपाळच्या दौऱ्यावर

दोन दिवसीय दौऱ्यात मोदी तीन तीर्थस्थळांना भेटी देणार आहेत. मोदी त्यांच्या दौऱ्यात एका प्रकल्पाचे भूमिपूजनही करणार असून दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही होतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले आहेत. भारतासाठी नेपाळ अत्यंत महत्वाचा देश आहे. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नेपाळच्या दौऱ्यावर गेले आहेत त्यातून ही गोष्ट लक्षात येते. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होत आहे.

संबंध अधिक दृढ

मोदींच्या या दौऱ्यातून शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देण्याच्या धोरणाबद्दल असलेली कटिबद्धता दिसून येते. मधल्या काळात भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले होते. पण आता मोदींच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा धागा अधिक घट्ट होईल. भारत आणि नेपाळमध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. रणनितीक दृष्टीकोनातून नेपाळ भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे पण अलीकडच्या काळात नेपाळवर चीनचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे भारत-नेपाळ संबंध अधिक दृढ करणे हा मोदींच्या दौऱ्यामागचा महत्वाचा उद्देश आहे.