नवी दिल्ली । भारताच्या फाळणीवर आता नवा वाद निर्माण झाला आहे. ज्या भारत पाकिस्तान फाळणीच्या जखमा अजूनही सुकलेल्या नाहीत ती फाळणी पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांच्यामुळे झाली, असा खळबळजनक आरोप जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत.
भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती व्हावी ही मोहम्मद अली जिना यांची भूमिका नव्हती. मुस्लहम, शीख आणि इतर अल्पसंख्याकांना विशेषाधिकार दिला पाहिजे यासाठी एक समिती स्थापण्यात आली होती. मोहम्मद अली जिना यांनी विशेषाधिकार समितीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांनी हा विशेषाधिकार दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने फाळणी करावी लागली, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
तिरस्काराची बीजे तेव्हाच रोवली
पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेण्यात चूक केली नसती तर देशाची फाळणी झालीच नसती. आधी पाकिस्तान आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झालीच नसती. भारत अखंड राहिला असता. त्यावेळी तिरस्काराचे जे बीज रोवले गेले त्याची फळे आजही समाज भोगतो आहे. धर्म आणि जातीच्या आधारावर जनतेत फूट पाडण्यात आली, असाही आरोप अब्दुल्ला यांनी केला. अब्दुल्ला यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षांच्या नेत्यांमध्ये संतापाची भावना आहे. यामुळे राष्ट्रपुरुषांच्या कार्यावर संशय निर्माण केला जातो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
जिनांचा आग्रह नव्हता
चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, जम्मू यांच्यातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यातही अब्दुल्ला यांनी हेच वक्तव्य केले. मोहम्मद अली जिना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आग्रही नव्हते. फाळणीऐवजी मुस्लिमांसाठी वेगळे नेतृत्व असेल, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता तसेच अल्पसंख्याक आणि शीख यांच्यासाठी वेगळी यंत्रणा असेल, असेही समितीने म्हटले होते. मात्र, नेहरू, आझाद आणि पटेल यांनी हा प्रस्ताव धुडकावला.