वॉशिग्टंन । भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या ज्येेष्ठ लष्करी अधिकार्याने दिला आहे. पाकिस्तानात राहून भारतात हल्ले करणार्या दहशतवाद्यांच्या कारवाई करण्यासाठी भारत पाकिस्तानविरुद्ध अणुयुद्धाचा पर्याय स्वीकारू शकतो, असा अहवाल अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल जोसेफ वॉटेल यांनी सैन्य सेवासंदर्भात काम करणार्या समितीला दिला आहे.
गुरुवारी वॉटेल यांनी अमेरिकन खासदारांशी बोलताना सांगितले की पाकिस्तानात राहणार्या दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई होत नसल्यामुळे भारत चिंतेत आहे. गेल्यावर्षी त्यामुळेच भारताने पाकिस्तानात लष्करी कारवाई, सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यामुळे दहशतवादी हल्ले कायम राहिल्यास भारताने पाकिस्तानाविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
भारताची कुटनीती ठरतेय अडसर
दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करत नसल्यामुळे भारताने विविध पातळ्यांवर पाकिस्तानला एकटे पाडण्याची रणनीती आखली आहे. पण त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होत नाही. भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानबरोबर असलेले संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या सगळ्यांचे पर्यवसान अणुयुद्धात होऊ शकते, असे वॉटेल यांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट केले आहे.