भारत-पाक धुसफूस

0

गेल्या काही दिवसांत पाकिस्तानात काहीतरी गडबड सुरू झाली आहे. आजवरचा अनुभव असा आहे, की पाकिस्तानात नागरी सत्ता आणि लष्करी सत्ता यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या, म्हणजे सीमेवर किंवा काश्मिरात पाक सेनेकडून कुरापती काढण्याला वेग येत असतो. आताही नेमक्या तशाच चकमकी झडू लागल्या आहेत. त्याला भारताने चिथावणी दिली, असेही काही दिसत नाही. म्हणूनच पाकिस्तानात नेमके काय चालले आहे, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. मध्यंतरी सर्जिकल स्ट्राइकनंतर नागरी सत्ता व लष्करात बेबनाव माजलेला होता. पण तेव्हा राहिल शरीफ पाकचे सेनाप्रमुख होते आणि आता त्यांच्या जागी जनरल बाजवा आलेले आहेत. त्यांनीही तशीच कुरापत चालू ठेवलेली आहे. राहिल शरीफ असताना भारताने उरी येथील घातपाती हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राइक केला होता. तेव्हा पाकची पाचावर धारण बसली होती. तसा हल्ला झालाच नसल्याचेही आधी पाककडून सांगण्यात आले होते. पण पाकचे छुपे लष्कर मानल्या जाणार्‍या तोयबाच्या म्होरक्याने सूडाची भाषा वापरून, भारतीय सर्जिकल स्ट्राइकला दुजोरा दिला होता. त्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उपस्थितीत काही राजकीय नेत्यांनी पाक गुप्तचर खात्याच्या प्रमुखाला चांगलेच धारेवर धरले होते. त्याची बातमी द डॉन नामक वर्तमानपत्रात आली आणि भांडे फुटले होते. आधी त्याचाही इन्कार करण्यात आला आणि आता त्यावरूनच काहूर माजले आहे. नवे लष्करप्रमुख बाजवा आणि नवाज शरीफ यांच्यात वाद सुरू असल्याच्या बातम्या आहेत. पण त्या भांडणाचे कारण वेगळेच आहे. भारताचे एक पोलाद उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी पाकिस्तानात जाऊन शरीफ यांची भेट घेतल्याने पाकसेना अस्वस्थ आहे. जिंदाल गेल्याच आठवड्यात पाकिस्तानला जाऊन आले. त्यांनी शरीफ यांची कशाला भेट घेतली? त्यावरून वाद होण्याचे काय कारण असावे?

2015 सालात अकस्मात रशियाहून माघारी येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाट वाकडी करून, पाकिस्तानला धावती भेट दिलेली होती. अवघ्या काही तासांसाठी झालेल्या या भेटीत मोजक्या लोकांचे शिष्टमंडळ घेऊन शरीफ यांच्या गावच्या घरी मोदी पोहोचले होते. त्याविषयी एकूणच पाकिस्तानी सरकार व गुप्तचर विभागालाही अंधारात ठेवले गेले होते. कंदाहार येथून दिल्लीकडे येताना मोदींचे विमान लाहोरला उतरले आणि तिथे त्यांच्या स्वागताला नवाज शरीफ जातीनिशी उपस्थित राहिले होते. तिथून त्यांचा लवाजमा मुरी या शरीफ यांच्या गावी गेला व एका लग्नसमारंभाला मोदींनी हजेरी लावली होती. पाकमधील भारतीय राजदूतालाही अवघा तासभर आधी या भेटीची सूचना मिळाली. लाहोर विमानतळावर त्यालाही कसेबसे पोहोचता आले. मग एकूण पाक गुप्तचर किती गाफील असतील याची कल्पना येऊ शकते. पाकचे गुप्तचर खाते नागरी सरकारपेक्षाही लष्करी नेतृत्वाला मानते. म्हणूनच मोदीभेटीबद्दल प्रत्यक्षात शरीफ यांनी लष्करालाही गाफील ठेवले, असा त्याचा अर्थ लावला गेला होता. पण त्यातून भारताचे आपण मित्र आहोत, असेच शरीफ यांनी दाखवून, आपल्याच लष्कराला डिवचले होते. हा सगळा चमत्कार सज्जन जिंदाल नावाच्या एका भारतीय उद्योगपतीने घडवून आणल्याचेही नंतर प्रसिद्ध झाले होते. कारण सज्जन व शरीफ हे जुने मित्र आहेत. जिंदाल भारतातील पोलाद धंद्यातले अग्रणी आहेत, तर शरीफ यांचा पाकिस्तानातील पोलाद उद्योग अग्रणी मानला जातो. त्यामुळे हे शक्य झाले होते. असे सज्जन जिंदाल गेल्या आठवड्यात पाकिस्तानला भेट देऊन आल्याचे समजते. त्यांच्या त्याच भेटीविषयी पाक लष्करात नाराजी आहे. कारण त्यांनी व्हिसाच्या नियमाचे उल्लंघन केले, असे म्हटले जात आहे. सज्जन जिंदाल यांना लाहोरचा व्हिसा मिळालेला असताना, ते विनासायास मुरीपर्यंत पोहोचले अशी तक्रार आहे.

ज्या जिंदाल यांनी लष्कराला गाफील ठेवून मोदींची लाहोर भेट घडवून आणली, तेच गुपचुप पुन्हा शरीफना मुरी येथील खानदानी घरी जाऊन भेटतात, याचे पाकसेनेला वैषम्य कशाला वाटावे? एक भारतीय नागरिक पाकिस्तानात मोकळेपणाने फिरल्याचा राग आहे, की तो गुपचूप शरीफना भेटल्याची चिंता आहे? की सेनेला अंधारात ठेवून शरीफ काही डाव शिजवत असल्याच्या भयाने पाकसेनेच्या म्होरक्यांना भयभीत केले आहे? शरीफ यांना युद्ध नको आहे तसेच आपल्या
नागरी सत्तेवर लष्कराचे प्रभुत्व चालू नये, असेही वाटत असू शकते. साहजिकच पंतप्रधानाने आपल्याच डोक्याने चाललेले लष्करी नेत्यांना रुचत नसेल, तर योग्यच आहे. पण घाबरण्यासारखे काय झाले आहे? पाकिस्तानात नेहमी लष्करी नेतृत्वाने उठाव करून नागरी सत्ता बरखास्त केलेली आहे. निवडून आलेल्या सरकारला बडतर्फ करून लष्करी हुकूमशाही स्थापन केलेली आहे. तशा स्थितीत तिथल्या राजकीय नेत्यांना कोणीही मदतीचा हात दिलेला नाही. अपवाद आहे तो इंदिराजींचा! त्यांच्या कालखंडात पूर्व पाकिस्तानातील नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतीय सेना घुसल्या होत्या आणि त्यांनी पूर्व पाकिस्तान लष्करशाहीतून मुक्त केला होता. त्यालाच आज जग बांगलादेश म्हणून ओळखते. काहीशी तशीच खेळी मोदी-शरीफ मिळून खेळत आहेत काय? पाकमध्ये ज्याप्रकारे लष्कराचा प्रत्येक बाबतीत वरचष्मा आहे. त्यामुळे राजकारणाला कुठेही वाव राहिलेला नाही. त्यालाच शह देण्यासाठी शरीफ भारताची मदत घेऊ शकतात काय? निदान चीन वा अन्य कोणी तशी मदत देणार नाही. कारण बाकी सर्व मोठ्या देशांना पाकला मोहर्‍याप्रमाणे वापरायचे आहे आणि ते लष्करी नेतृत्वाकडूनच सोपे व शक्य आहे. राजकीय नेतृत्व निर्णायक असले, तर त्या बड्या देशांना पाकचा हवा तसा धोरणात्मक वापर करता येणार नाही. भारताची गोष्टच वेगळी आहे.

पाकिस्तानी सुबुद्ध समाज व पुढारलेल्या लोकांनाही जिहाद व हिंसाचारी धर्मांधतेचा कंटाळा आला आहे. त्याला राजकीय नेतृत्व लगाम लावू शकलेले नाही. पण भारत विरोध वा द्वेश यावरच पाकचा पिंड पोसला गेला असल्याने, लष्कराने तीच रणनीती करून ठेवली आहे. त्याला शह देण्याची कुवत राजकारण्यांमध्ये उरलेली नाही. पण अशा कामासाठी अन्य कुठल्या देशाची मदत घेतली, तर आपल्यालाच परक्यांच्या गुलामीत जाण्याचे भय असते. इतर देशांची तशी ख्याती असली, तरी भारताची गोष्ट वेगळी आहे. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यावर भारताने कधीही त्या देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केलेली नाही. साहजिकच उद्या पाकच्या लष्कराचे कंबरडे मोडल्यावर भारतीय सेना पाकमध्येच मुक्काम ठोकून सत्ता काबीज करण्याचे भय नाही. हीच शरीफ यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच जिहादच्या आहारी जाऊन देशाच्या विकासाचे मार्ग कुंठित करणार्‍या लष्करी नेतृत्वाला नामोहरम करण्यासाठी शरीफ भारताची मदत मागू शकतात. तसे झाल्यास पाक लष्कराला लढाई सोपी जाणार नाही. पण तशी कितपत शक्यता आहे? शून्य टक्के शक्यता असली, तरी तशी भीती पाकसेनेला असू शकते. कारण तसेच काहीसे बांगला युद्धाच्या कालखंडात घडलेलेही आहे. त्या इतिहासाची भीती पाकसेनेला सतावत असू शकते. म्हणूनच जिंदाल यांच्या मुरी भेटीने लष्करी नेते कमालीचे विचलित झाले आहेत. त्यांनी त्याच व्हिसाचे भांडवल करून शरीफ यांच्या सरकारला बदनाम करण्याचा पवित्रा घेतला आहे. पण त्यामुळेच वैतागलेले शरीफ अधिकच भारताच्या जवळ आले, तर काय होईल? उरलेल्या पाकिस्तानचेही तुकडे होतील काय? भारतीय सेना पाकला त्यांच्याच लष्कराच्या व जिहादींच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी सीमा ओलांडू शकते काय? सध्या चाललेल्या घटनाक्रमाकडे बघता तशी शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.