भारत-पाक सीमेवर तणाव वाढला

0

जम्मू कश्मीरमध्ये रेड अलर्ट

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी जवानांकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. दोन दिवसात भारताचे चार जवान शहीद झाले तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सीमेवर प्रचंड तणाव वाढल्यामुळे परिसरातील 300 शाळा पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर अर्निया, रामगढ, संबा आणि हिरानगर भागात पहाटे पाचपर्यंत पाकचा मारा सुरू होता.

लष्कराच्या 100 गाड्या; अ‍ॅम्ब्युलन्स तैनात
जम्मू, सांबा, पूंछ, कथुआ, राजौरी या जिल्ह्यातील सीमेलगतची शेकडो गावे रिकामी केली आहेत. पाकड्यांच्या हल्ल्यामुळे अनेकांच्या घरांचे, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या गावांमधील 40 हजारांवर नागरिकांना लष्कराने, बीएसएफने सुरक्षितस्थळी हालविले. नागरिकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्यासाठी लष्कराने 100च्या वर वाहनांची सोय केली. जखमी नागरिकांना रुग्णालयात हलविण्यासाठी ऍम्ब्युलन्सही तयार ठेवण्यात आल्या. तीन दिवसांत पाकच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या भारतीयांची संख्या 10 झाली आहे, तर 50 जखमी झाले आहेत. आर. एस. पुरा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात येथे सर्व कौलारू घरांना आग लागली. घरे जळून खाक झाली. अनेक दुभती जनावरे होरपळली. 150 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानला धडा शिकवा
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो.
-के. के. शर्मा, महासंचालक , बीएसएफ

पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू
-राजनाथ सिंह यांचा इशारा
लखनऊ : पाकने हे वर्तन थांबवले नाही तर सीमेवर दिल्या जाणार्‍या प्रत्युत्तराप्रमाणेच सीमा ओलांडूनही भारतीय जवान कारवाई करतील असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. मात्र पाकिस्तानला इथे दहशतवादी कारवाया घडवण्यात आणि कुरापती काढण्यातच रस आहे त्यामुळे वेळ पडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. राजनाथ सिंह रविवारी लखनऊमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. भारताची मान कोणत्याही परिस्थितीत खाली झुकू देणार नाही असेही सिंह यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होते आहे. पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबारही केला जातो आहे. या गोळीबाराला भारतीय सैन्य जशास तसे उत्तर देते आहे. पाकिस्तानचे दहा रेंजर्स भारतीय सैन्याने नुकतेच ठार केले. मात्र गेल्या चार दिवसात भारताचे 6 जवान शहीद झाले आहेत. ही बाब चिड आणणारी आहे. त्यामुळे पाकिस्तानने तातडीने त्यांचे हल्ले थांबवावेत नाहीतर आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना जशास तसे उत्तर देऊ असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.