भारत पेट्रोलियम, नौदल महिंद्र उपांत्य फेरीत

0

मुंबई । दिल्ली, एस एम बी – हरियाणा, वैष्णवी – हैदराबाद, पंजाब राज्य यांनी महिलांच्या गटात, तर भारत पेट्रोलियम, महिंद्रा, भारतीय नौदल, एअर इंडिया यांनी महर्षी दयानंद स्पोर्ट्स, बी. के. फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी – बोरिवली व महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय महिला व पुरुष गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. महाराष्ट्रातील एकाही महिला संघाला या स्पर्धेच्या पहिल्या चार संघात स्थान मिळविता आले नाही. पुरुषांमध्ये मात्र महाराष्ट्राच्या संघानी आपली दावेदारी अजून कायम ठेवली. एसएसबी हरियाणा विरुद्ध वैष्णवी हैदराबाद आणि पालम दिल्ली विरुद्ध पंजाब राज्य अशा महिलांत, तर भारत पेट्रोलियम विरुद्ध महिंद्रा आणि भारतीय नौदल विरुद्ध एअर इंडिया अशा पुरुषांत उपांत्य लढती होतील. त्यानंतर अंतिम सामने होतील. गोराई – बोरिवली येथील जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पालम स्पोर्ट्स – दिल्लीने अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवशक्तीचा प्रतिकार 25-20असा मोडून काढला. मध्यांतराला 10-09अशी आघाडी घेणार्‍या शिवशक्तीला नंतर मात्र तो जोश राखता आला नाही. उत्तरार्धात पालमच्या रितू, निशा, पिंकी यांनी जोरदार प्रतिकार करीत संघाला 5 गुणांनी उपांत्य फेरी गाठून दिली. शिवशक्तीच्या अपेक्षा टाकळे, रेखा सावंत यांचा खेळ उत्तरार्धात बहरला नाही.

पुरुषांच्या उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियमने पंजाब पोलीस संघाला 25-14असे सहज नमवले. मध्यांतरा 11-08अशी आघाडी घेणार्‍या पेट्रोलियमने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. दीपचंद, रोहित राणा, सुरेंद्र सिंग, काशिलिंग आडके यांना या विजयाचे श्रेय द्यावे लागले. पोलिसांच्या जसबीर सिंगने एकट्याने कडवी लढत दिली. महिंद्राने युनियन बँकेवर 28-20 असा विजय मिळविला. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ 10-10असे बरोबरीत होते. उत्तरार्धात मात्र बँकेचे अवसान गळाले. आनंद पाटील, ओमकार जाधव, ऋतुराज कोरवी यांच्या खेळाला बँकेकडे उत्तर नव्हते. बँकेकडून नितीन मोरे, नितीन गोगावले यांनी पूर्वार्धात चांगली लढत दिली. एअर इंडिया – देना बँक हा सामना चुरशीने खेळला गेला. यात एअर इंडियाने 36-34 अशी बाजी मारली. मध्यांतराला 22-16अशी आघाडी घेणार्‍या एअर इंडियाला नंतर मात्र बँकेने जोरदार प्रतिकार केला. एअर इंडियाकडून शब्बीर, मोनू, विकास काळे, सिद्धार्थ देसाई, तर देना बँकेकडून सिद्धार्थ कुळे, पंकज मोहिते, अक्षय भोईर यांनी उत्तम खेळ केला. शेवटच्या सामन्यात भारतीय नौदलने मध्यांतरातील 17-19अशा पिछाडीवरून महाराष्ट्र पोलिसांचे कडवे आव्हान 32-30असे परतवून लावले. सुलतान डांगे, बाजीराव होडगे, धनंजय यांनी आक्रमक सुरुवात करत मध्यांतरा 19-17 अशी आघाडी घेण्यात यश मिळविले होते. पण ही आघाडी त्यांना फार काळ टिकविता आली नाही. नौदलाच्या कुलदीप, नीरज यांनी उत्तरार्धात जोरदार प्रतिआक्रमण करत आपल्या संघाला 2 गुणांनी विजय मिळवून दिला.

एसएसबीचा कडव्या संघर्षांनंतर विजय!
महिलांच्या दुसर्‍या सामन्यात हरियाणाच्या एसएसबीने तामीळनाडूच्या एसएमव्हीकेचा कडवा संघर्ष 36-33, असा संपविला. विश्रांतीला 19-22, अशा 3 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या हरियाणाने सामना संपायला शेवटची 5मिनिटे शिल्लक असताना 31 – 31अशी बरोबरी साधली. त्यानंतर प्रियंका, सोनू यांनी चढाईत एक-एक गुण घेत व रितू आणि मोनिका यांनी एक पकड करीत संघाला 4 गुणांनी विजय मिळवून दिला. तामिळनाडूकडून एमए रॉलमोझील, पी जिना यांनी शर्थीची लढत दिली. वैष्णवी हैदराबादने जागृती प्रतिष्ठानचा 44-10असा धुव्वा उडविला.मोनिका राय, पिंकू राय यांचा झंझावात रोखने जागृतीला जमले नाही.शेवटच्या सामन्यात पंजाब राज्यने महाराष्ट्र पोलिसांचे आव्हान 26-20,असे मोडीत काढले. परवीन, रणबीर, अनिंदर यांनी चढाई पकडीचा उत्कृष्ट खेळ करीत हा विजय साजरा केला.