धुळे : काँग्रेससह सहयोगी पक्षानी पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड वर काही प्रमाणात बंद चा परिणाम सकाळी अकरा वाजेपर्यंत होता. त्यानंतर मात्र दुकाने व बाजार सुरळीत सुरू झाला .एसटी सेवा व शाळा, महाविद्यालयेही सुरळीत सुरू होती. त्यामुळे बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. बंदच्या पाश्र्वभूमीवर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठया प्रमाणात ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महात्मा गांधी पुतळयाजवळ इंधन दरवाढीविरोधात काॅग्रेस व राष्ट्रवादी व मनसे तर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार डी.एस अहिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, रणजित भोसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, प्रसाद देशमुख, गिरीश कुलकर्णी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
साक्री-पिंपळनेर शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. साक्री शहरात सरकारच्या चुकीच्या धोरणांचा व इंधन दरवाढीचा निषेध करत एक मोटारसायकल, गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढली. यात काँग्रेस सह, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.