लोणावळा : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांतर्फे सोमवारी देशभरात पाळण्यात आलेल्या बंदला लोणावळा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष यांनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध केला. लोणावळा शहरातील गवळीवाडा नाका परिसरात सोमवारी सकाळपासूनच कडकडीत बंद बघायला मिळाला. या परिसरातील जवळजवळ सर्वच दुकाने तसेच हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. पण त्याचवेळी लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच अन्य ठिकाणी या बंदचा जास्त परिणाम जाणवला नाही. या बंदमध्ये सहभागी झालेल्या सर्व विरोधी पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी चौकात निषेध सभा घेत केंद्र सरकारवर जोरदार टिका करीत आपला निषेध नोंदविला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक नगरसेवक निखिल कवीश्वर, नगरसेवक सुधीर शिर्के, संजय घोणे, नगरसेविका पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, आरोही तळेगावकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब कडू, मंजुश्री वाघ, दीपक मानकर, मनसेचे भरत चिकणे, रुपेश नांदवटे आदींसह आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.