भारत बनतोय तापमानवाढीचा बळी

0

नवी दिल्ली : भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने (आयआयटीएम) भारतातील तापमानात १९८१ पासून लक्षणीय वाढ होत असल्याचे साधार दाखवून दिले आहे. भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी भारतातील हवामान बदल हा अहवाल प्रकाशित केला. त्यात तापमानबदलाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आतापर्यंत २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष होते, असेही आयआयटीएमच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

भारतात मागील तीन दशकात तापमानामध्ये ०.१४, ०.१७ आणि ०.१४ अंश सेल्सिअस अशी वाढ झालेली आहे. भूविज्ञान मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या आयआयटीएमने भारतात तापमानवाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. १९०१ ते २०१० या कालवधीत वार्षिक तापमान वाढ ०.६ अंश सेल्सिअसने होत होती. रात्री थंडावा अपेक्षित असताना उष्णता होती आणि दिवसा नेहमीपेक्षा उष्णता होती, अशी स्थिती बऱ्याचदा निर्माण झाली.

इशान्येकडील भागांमध्ये तसेच पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण भागातील पर्जन्यमान घसरत चालले आहे, असेही अहवालात म्हटले आहे. पर्जन्यमानाचा एकत्रित विचार करता एका ठिकाणचा कमी पाऊस दुसऱ्या ठिकाच्या जास्त पावसाच्या प्रमाणाने भरून काढला जात आहे. एकापाठोपाठ पाच दिवस कोरडे दिवस अनुभवास येण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे तर लागोपाठ पाच दिवस पाऊस असे प्रसंग दुर्मिळ झाले आहेत.