भारत-बांगलादेशादरम्यान रेल्वे, बस धावणार!

0

नवी दिल्ली : भारत दौर्‍यावर आलेल्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शनिवारी हैदराबाद हाऊस येथे झालेल्या शिखर परिषदेत दोन्ही देशांदरम्यान 22 करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्यात. त्यात कोलकाता ते खुलाना शहरादरम्यान रेल्वे चालू करणे, तसेच दोन बससेवा सुरु करणे यांचा समावेश आहे. 1 जुलैपासून ही रेल्वेसेवा सुरु होणार आहे. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारताकडून बांगलादेशाच्या लष्करासाठी 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्जरुपात अर्थसहाय्य देण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

दोन्ही देश अणुऊर्जा क्षेत्रात संयुक्त काम करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी व शेख हसिना यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या 22 करारांची माहिती दिली. भारत व बांगलादेशातील संबंधांत आता नवा अध्याय लिहिला गेला असून, दोन्हीही देश आर्थिक मुद्द्यांवर एकत्रित पुढे जातील, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला. शेजारी राष्ट्रांच्या वीजेची गरजही भारत भागवेल, असेही ते म्हणाले. भारताने नेहमीच बांगलादेशाच्या समृद्धीची अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र लढावे. बांगलादेशाच्या लष्करासाठी 500 दशलक्ष डॉलरच्या कर्जाची घोषणादेखील मोदी यांनी केली. दोन्हीही देश अणुऊर्जा क्षेत्रात एकत्र काम करतील, त्यासाठी एक रुपरेषाही तयार करतील, असेही मोदी म्हणाले. बांगलादेशात भारताद्वारे लवकरच परमाणू रिएक्टर स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली.

पंतप्रधान, राष्ट्रपतींच्यावतीने शाहीभोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे शेख हसिना यांना शनिवारी शाहीभोजन देण्यात आले. दुपारी हसिना यांनी 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात बलिदान देणार्‍या शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मानदेखील केला. संध्याकाळी त्यांनी उपराष्ट्रपती मोहम्मद अन्सारी यांची भेट घेतली. रविवारी त्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाह येथे भेट देणार आहेत. तर रविवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शाही भोजनास उपस्थित राहणार आहेत. सोमवारी वरिष्ठ वाणिज्यिक संघटनांसोबत त्यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता त्या मायदेशी परत जाणार आहेत. शनिवारी सकाळी हसिना यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत करण्यात आले. त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. त्यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण केली.