नवी दिल्ली । जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्या पी.व्ही.सिंधू आणि कांस्यपदक विजेती सायना नेहवालने एकाच स्वरात भारत बॅडमिंटनमधील नवी सुपरपॉवर असल्याचा नारा दिला. केंद्रिय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आयोजित केलेल्या सत्कारसोहळ्यात बोलताना सिंधू आणि सायनाने हे मत व्यक्त केले. आपल्या शासकिय निवास्थानी गोयल यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय कोच पुलेला गोपिचंद, सायनाचे मार्गदर्शक विमलकुमार, पुरूषगटाततील आघाडीचे बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. यावेळी गोयल यांच्या हस्ते खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सिंधू, सायना आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष धन्यवाद देताना, पंतप्रधान स्वत: खेळांमध्ये रूची घेतात आणि खेळाडूंना प्रोत्साहीत करतात हे आमच्यासाठी अभिमानस्पद आहे. स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यावर असा सन्मान मिळाल्यावर मनोबल उंचावते असे सांगितले.
रौप्यपदक विजेती सिंधू म्हणाली की, बॅडमिंटन सध्या वेगळ्या उंचीवर आहे. खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. स्पर्धेतील माझा अंतिम सामना खूपच कठिण असा होता. बॅडमिंटनच्या इतिहासातील एक प्रदीर्घ काळ खेळला गेलेला तो सामना होता. मी माझे सर्वस्वपणाला लावले. 20-20 असा स्कोअर असतानाही निर्णय कोणाच्याही बाजूने लागला असता. जपानच्या खेळाडूनेही चांगला खेळ केला.