नवी दिल्ली । जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळख असलेल्या भारतात मानवी विकासाबाबत सरकारी पातळीवर उदासीनता असल्याचे उघडकीस आले आहे. मानवी विकास निर्देशांक यादीत भारताचा 131 वा क्रमांक लागत आहे. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आणि महासत्तेकडे वाटचाल करणार्या चीनशी स्पर्धा करणारा भारत मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या पंक्तित बसत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. भारत मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. आर्थिक आघाडीवर 2015 मध्ये भारताने समाधानकारक टप्पा गाठला असला तरी या वर्षीदेखील भारताचा मानव विकास निर्देशांकाची स्थिती खालावलेली होती. 2014 मध्ये याबाबत भारत 131 क्रमांकावर होता. मागील काही वर्षांत भारताची प्रगती निराशाजनक राहिल्याने भारताचा अद्यापही या यादीत 131 वा क्रमांक लागतो.
63 टक्के जनता समाधानी
मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत महासत्तेची स्वप्ने पाहणारा भारत बांग्लादेश, पाकिस्तान, भूतान, म्यानमार आणि नेपाळ यांसारख्या देशांच्या पंक्तित बसतो. मानव विकास निर्देशांकात क्रमांक कमी असेल तर, त्या देशाची स्थिती उत्तम समजण्यात येते. भारतातील 63 टक्के जनता आपल्या स्थितीबाबत आणि राहणीमानाबाबत समाधानी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतात सुरक्षित वाटते
भारतीय व्यक्तिचे सरासरी आयुष्यमान 68.3 वर्षे इतके आहे. भारतात तुम्हाला सुरक्षित वाटते का, या प्रश्नावर 69 टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. भारतातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे उत्तर विशेष महत्त्वाचे आहे. 69 टक्के लोकांनी केंद्र सरकारवर विश्वास दर्शवला आहे. तर 74 टक्के लोकांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. 72 टक्के महिलांनी समाधानी असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय रोजगार योजनेचा देशातील गरिबांना आधार वाटत आहे. या योजनेमुळे सुरक्षेची भावना निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.