नवी दिल्ली : करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग या वर्षात मंदीचा सामना करणार आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार आहे, पण भारत आणि चीनला याचा फटका बसणार नाही, असा दावा संयुक्त राष्ट्राच्या व्यापार अहवालातून करण्यात आला आहे. यूएनने यातून सावरण्यासाठी २.५ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची गरज बोलून दाखवली आहे.
संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेच्या ताज्या विश्लेषणात काही मुद्द्यांचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करणार्या अर्थव्यवस्थांमध्ये पुढील दोन वर्षांसाठी २ ते ३ ट्रिलियन डॉलर परकीय गुंतवणुकीची घसरण पाहायला मिळणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदीचा सामना करण्याची शक्यता असून काही ट्रिलियन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांसाठी हे संकट मोठे असेल, ज्यातून चीन आणि भारत वगळला जाण्याची शक्यता आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.