नवी दिल्ली: वाघांसाठी भारत हा जगातील सर्वात सुरक्षित अधिवास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज सोमवारी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत ते होते. यावेळी मोदींकडून भारतातील वाघांच्या संख्येचा आढावा घेणारा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार सध्याच्या घडीला भारतामध्ये तीन हजार वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे. त्यामुळे वाघांसाठी भारत हा जगातील सुरक्षित अधिवासांपैकी एक असल्याचे मोदींनी सांगितले.
व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. तर महाराष्ट्रात आजघडीला २३०-२४० इतके वाघ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.