भारत विकास परिषदेच्या समुहगान स्पर्धेत आर.आर.,ओरीऑन, लुंकड शाळा विजेते

0

जळगाव : भारत विकास परिषद जळगाव शाखा आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत आर.आर.विद्यालय, ओरीऑन इंग्लीश मिडीयम स्कूल आणि प.न.लुंकड कन्या शाळा या तीन शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवित विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेत 16 शाळांच्या संघांनी सहभाग घेतला.

आदर्शनगरमधील लायन्स हॉलमध्ये गुरुवार दि.23 रोजी दुपारी परितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन मोहन कुळकर्णी, रमेश मतानी, समीर रोकडे, अध्यक्ष प्रशांत महाजन, प्रकल्प प्रमुख उमाकांत पाटील यांची उपस्थिती होती.
शारदाश्रम विद्यालयात 6 वी ते 8 वी आणि 9 वी व 10 वी अशा दोन गटांसाठी ‘भारत को जानो’ ही प्रश्‍नमंजुषा स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी पद्धतीने घेण्यात आली. त्यात शहरातील 17 शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत पहिल्या गटात प.न.लुंकड कन्या शाळा संघाने प्रथम तर उज्ज्वल स्प्राऊटर्स संघाने द्वितीय आणि सेंट तेरेसा शाळेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिके प्राप्त केले.

दुसर्‍या गटात प्रथम क्रमांक प्रोग्रेसिव्ह इंग्लीश मिडियम स्कूलने तर द्वितीय क्रमांक उज्ज्वल स्प्राऊटर्स शाळेने आणि तृतीय क्रमांक ब.गो.शानबाग विद्यालयाने मिळविला. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्र देण्यात आली. दोन्ही स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी कॅप्टन कुळकर्णी व समीर रोकडे यांनी आणि परिक्षकांच्या वतीने अलका चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. समूहगान स्पर्धेचे परिक्षण अलका चव्हाण, विशाखा देशमुख व सुप्रिया श्रावगी यांनी तर संचालन मयुर महाजन यांनी केले. ‘भारत को जानो’ स्पर्धेचे संचालन करण व पूजा कोचर यांनी तर शंतनू चौधरी यांनी सहकार्य केले.

सकाळच्या सत्रात स्पर्धेचे नंदलाल गादिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. नव्या पिढीत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी या दोन्ही स्पर्धा उपयुक्त असून साहित्य, संगीत यातून सृजनशीलता निर्माण होते असे गादिया यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्रशांत महाजन यांनी तर सूत्रसंचालन सचिव उज्ज्वल चौधरी व प्रतिमा याज्ञिक यांनी केले. आभार उमाकांत पाटील यांनी मानले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली. दोन्ही स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले