भारत विजयाची लय राखणार

0

कोलकाता । सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विराट कोहलीचा भारतीय संघ कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्यांच्यासमोर आव्हान आहे ते भारतीय उपखंडातल्याच श्रीलंकेचे. याआधी झालेल्या श्रीलंकेतील कसोटी मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेला 3-0 असा ब्राऊनवॉश दिला होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. पण त्या पराभवानंतर श्रीलंकेनेही पाकिस्तानला 2-0 अशा फरकाने हरवले आहे. त्यामुळे मायदेशात खेळताना विराट सेनेला गाफील राहून चालणार नाही. यंदाच्या वर्षात अनेक कसोटी सामने निकाली ठरले आहेत. ती परंपरा या मालिकेतही कायम राहून अव्वल दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळेल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा आहे.

तीन कसोटी सामन्यांच्या लढाईतील पहिली लढाई कोलकात्यात, दुसरी लढाई नागपुरात तर तिसरी लढाई दिल्लीत रंगणार आहे. ईडन गार्डन्सवरच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघ तीन महिन्यांनी पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट खेळणार आहे. जुलै-ऑगस्टमधल्या श्रीलंका दौर्‍यानंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. गेल्या तीन महिन्यांमध्ये भारतीय सेनेने तेरा एकदिवसीय आणि सहा ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. पण यंदाच्या मोसमातल्या रणजी सामन्यांंमध्ये भारतीय क्रिकेटपटू खेळले असल्याने पाच दिवसांच्या क्रिकेटशी जुळवून घेण्यात त्यांना अडचण येणार नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंका संघ आजवर भारतात सतरा कसोटी सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. पण त्यापैकी एकही कसोटी श्रीलंकेला जिंकता आलेली नाही. भारताने सतरापैकी दहा कसोटी सामने जिंकले असून, उभय संघांमधल्या सात कसोटी अनिर्णीत राहिल्या आहेत. दिनेश चंडिमलचा तुलनेत दुबळा संघ अपयशाची ती कोंडी फोडू शकेल का?, याविषयी जाणकारांच्या मनात शंका आहे. भारत दौर्‍यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेची मदार ही प्रामुख्याने अष्टपैलू अँजलो मॅथ्यूज आणि डावखुरा स्पिनर रंगाना हेराथ यांच्यावरच अवलंबून आहे. पण केवळ त्या दोन शिलेदारांच्या जीवावर श्रीलंका संघ भारत दौर्‍यात मोठा चमत्कार घडवणे संभवत नाही. श्रीलंकेच्या दृष्टीनं ईडन गार्डन्सवर आशेची एकच बाब म्हणजे कोलकात्याच्या या कसोटीवर पहिले तीन दिवस पावसाचे सावट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बुधवारी सकाळी कोलकात्यात पाऊस झाला. पुढच्या तीन दिवसांतही कोलकात्यात अधूनमधून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलकात्यातल्या हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन भारतीय संघात भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांचा, तर रवीचंद्रन अश्‍विन आणि रवींद्र जाडेजा या दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश होण्याची चिन्हे आहेत. भारताची ही आक्रमक रणनीती अर्थातच पावसावर आणि श्रीलंकेवरही विजय मिळवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल असेल.

विराट मोडणार गांगुलीचा विक्रम?
श्रीलंकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकल्यास विराट कोहली सौरव गांगुलीचा विक्रम मोडू शकतो. ही मालिका भारत 3-0 अशी जिंकला तर कोहली सर्वाधिक कसोटी जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार बनेल. धोनी हा भारताचा सगळ्यात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 60 कसोटी सामन्यांमध्ये 27 विजय मिळवले आहेत. तर गांगुलीच्या नेतृत्वात भारताला 49 सामन्यांमध्ये 21 विजय मिळाले. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आत्तापर्यंत 29 कसोटीपैकी 19 कसोटींमध्ये विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका भारत 3-0 ने जिंकला तर कोहलीच्या खात्यात 22 विजय होतील आणि तो गांगुलीचा विक्रम मोेडेल. जिंकण्याच्या टक्केवारीवर नजर टाकली तर 65.51 टक्क्यांसह विराट कोहली यशस्वी भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वात लागोपाठ 8 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. 2015मध्ये भारताने श्रीलंकेला त्यांच्याच मायभूमीत 2-1ने हरवले. त्यानंतर भारतानं दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा पराभव केला होता.

प्रोटीज खेळपट्टी
सामना जरी भारतात खेळला जात असला, तरी या सामन्यासाठी वेगळ्या स्वरुपाची खेळपट्टी बनवण्यात आली आहे. या खेळपट्टीवर गवत राखण्यात आले आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दोन महिन्यांसाठी द.आफ्रिकेच्या दौर्‍यावर जाणार आहे. हा दौरा नजरेसमोर ठेवून तिकडे असणार्‍या खेळपट्ट्या भारतात तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावरच भारतीय क्रिकेटपटूंना त्या दौर्‍यासाठी तयारी करण्याची संधी देण्यात आली आहे. या खेळपट्टीमुळे भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज खेळताना पहायला मिळाले तर नवल वाटणार नाही

घडू शकतात ऐतिहासिक क्षण
कोलकात्याचे ईडन गार्डन्सचे मैदान अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. गुरुवारपासून सुरु होणार्‍या सामन्यातही अनेक इतिहास घडू शकतात. भारताच्या आर. अश्‍विनला जलदरीत्या 300 विकेट्सचा पल्ला गाठण्यासाठी फक्त आठ विकेट्सची आवश्यकता आहे. सलग सात कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतके ठोकणारा लोकेश राहुल संयुक्तरीत्या जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यात त्याने आणखी एक अर्धशतक ठोकले तर सलग आठ अर्धशतके झळकवणारा तो कसोटी क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरेल. सलामीचा युवा फलंदाज दिमुथ करुणारत्नेला एक वर्षात एक हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी आणखी 60 धावांची आवश्यकता आहे.