सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील आजपासून चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे दिले होते. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
As a mark of respect to the demise of Mr.Ramakant Achrekar, the team is wearing black arm bands today. #TeamIndia pic.twitter.com/LUJXXE38qr
— BCCI (@BCCI) January 2, 2019
सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघ दंडावर काळ्या रिबीन बांधून मैदानात उतरला. यासंदर्भात बीसीसीआयने एक ट्विट करून माहिती दिली आहे. रमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू मैदानात काळी पट्टी बांधून उतरले आहेत. असे बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांचे काल बुधवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. १९३२मध्ये मालवण येथे जन्मलेल्या आचरेकर यांनी १९४३पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. १९४५ मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधित्व केले. यासोबतच त्यांनी यंग महाराष्ट्र एकादश, गुलमोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचेही प्रतिनिधित्व केले होते. आपल्या कारकिर्दीत केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळताना आचरेकर यांनी १९६३-६४मध्ये आॅल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. मात्र, क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांनी एक वेगळीच उंची गाठली.