भारत वि. न्यूझीलंड कसोटी सामना: पहिल्याच दिवशी पावसाचा खोडा; खेळ थांबला !

0

वेलिंग्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच पावसाने खोडा घातला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या कसोटी सामन्याचा खेळ थांबवण्यात आला. पहिल्या दिवसअखेर भारताने ५५ षटकांत ५ बाद १२२ अशी मजल मारली आहे.

पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रात भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण अजिंक्य रहाणेने संघाची पडझड सुरु असताना त्याने एका बाजूने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. अजिंक्यने १२२ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर सर्वाधिक नाबाद ३८ धावांची खेळी साकारली. अजिंक्य खालोखाल सलामीवीर मयांक अगरवालच्या नावावर ३४ धावा आहेत. दुसऱ्या सत्राचा खेळ संपल्यानंतर पाऊस सुरु झाला आणि त्यामुळे तिसऱ्या सत्राच्या खेळाला अजूनही सुरुवात होऊ शकली नाही.

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर कोहली पहिल्यांदाच कर्णधार म्हणून गेला आहे. कर्णधार म्हणून न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात पहिल्यांदा खेळताना कोहलीला दोन धावा करता आल्या. हा आतापर्यंत भारतीय कर्णधारांचा निच्चांक आहे. कारण यापूर्वी सौरव गांगुलीने न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात पहिल्यांदा खेळताना दोन धावा केल्या होत्या. नवाब पतौडी यांनी ११, सुनील गावस्कर यांनी नाबाद ३५, बिशनसिंग बेदी यांनी ३०, मोहम्मद अझरने ३०, वीरेंद्र सेहवागने २२ धावा केल्या होत्या. पण या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा खेळताना ४७ धावा केल्या होत्या.