भारत हिशोब चुकता करणार का?

0

मुंबई । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 सप्टेंबर रोजी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताना 30 वर्षांपूर्वी मिळालेल्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा इरादा विराटसेनेचा असेल. उभय देशांमध्ये या मैदानावर शेवटचा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 1987 रोजी रिलायन्स विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला अवघ्या एक धावेने पराभव पत्कारावा लागला होता. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आतापर्यत एकुण 21 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. पण संयोगाने केवळ एकदाच भारत आणि ऑस्ट्रेलिया या मैदानावर समोरासमोर आले. भारताशिवाय ऑस्ट्रेलियाने या मैदानावर तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. प्रत्येक वेळी त्यांचे प्रतिस्पर्धी निरनिराळे होते. ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानावर झिम्बाब्वेे, वेस्टइंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळला आहे. भारताने चेपॉक मैदानावर एकूण 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील सहा सामने भारताने जिंकले, तर चार सामने गमावले. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

रिलायन्स विश्‍वचषक स्पर्धेतील त्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना जेफ मार्शच्या 110 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात 270 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना कृष्णम्माचारी श्रीकांत (70) आणि नवज्योतसिंग सिद्धूने (73) अर्धशतके झळकवत भारताला विजयाच्या जवळ नेले होते. पण शेवटच्या 40 धावांमध्ये सात विकेट्स गमावल्यामुळे भारताला विजयासाठी अवघी एक धाव कमी पडली.

ऑस्ट्रेलियाने मात्र या मैदानावर खेळलेले सर्व चारही सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यांशिवाय भारत या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामने भारताने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहीला. भारताने 1998, 2001 आणि 2013 मध्ये खेळले गेलेले कसोटी सामने जिंकले. 2004 मधील कसोटी सामना अनिर्णीत राहिला.